पिंपरी : अंगणवाडी सेविकांना 2021 मध्ये कामासाठी दिलेले स्मार्ट फोन कामांसाठी त्रासदायकच ठरू लागल्याने अखेर शासनाकडे जमा केले होते. त्यामुळे आम्हाला चांगले मोबाईल देऊन त्यामध्ये पोषण ट्रॅकर अॅप देण्याची मागणी केली होती. मात्र, दोन वर्ष झाले तरी नवीन स्मार्टफोन अंगणवाडी सेविकांना मिळाले नाहीत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना त्यांच्या पदरचे नेट टाकून ऑनलाइन काम करावे लागतेय. राज्यात पोषण अभियानअंतर्गत अंगणवाडी सेविकांना व मुख्यसेविकांना 2019 मध्ये स्मार्ट फोन दिले होते. मात्र, दोन वर्षांत काम वाढत गेले आणि मोबाइलची क्षमता कमी पडत गेली. सुमार दर्जाचे हे स्मार्टफोन असून त्याचा दुरुस्ती खर्चही परवडत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी करून स्वत: कडील स्मार्टफोन परत केले होते. यामध्ये शहरातील 361 अंगणवाडी सेविकांचा समावेश होता.
शासनाने दिलेल्या स्मार्टफोनची वॉरंटी दोन वर्षे होती. तसेच फोनमध्ये फक्त दोन जीबी रॅम होती. त्या तुलनेत लाभार्थ्यांची भरायची माहिती खूप जास्त असल्याने मोबाइल हँग व्हायचे. अनेक मोबाईल हे खराब झाल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी तीन ते आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येत होता.
अंगणवाडी सेविका सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनांच्या नोंदी, लसीकरण यांसह दैनंदिन कामकाजाचा आढावा लिखित स्वरूपात ठेवण्यात येतो. या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो. ही नोंद ऑनलाइन झाल्यावर अंगणवाडी सेविकांचे काम कमी होणार होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने काम करावे लागत आहेत. कामासाठी सध्या स्वत:च्या फोनचा वापर आणि नेटपॅकचा खर्च तसेच ऑफलाइन कामसाठी रजिस्टरदेखील स्वखर्चाने विकत घ्यावे लागत आहे.
स्मार्टफोनचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे आम्ही दीड वर्षापूर्वी मोबाईल वापसी हे आंदोलन करून शासनाकडे सर्व फोन जमा केले होते. तरीदेखील पोषण ट्रॅकरवर ऑनलाइन माहिती जमा करण्याची सक्ती केली जाते. हे करू नये म्हणून आम्ही कोर्टातदेखील गेलो होतो. कोर्टानेदेखील लवकरात लवकर फोन देण्याचे आदेश दिले होते. तरी अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
नितीन पवार
(प्रदेश उपाध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा)
हेही वाचा