पुण्यात गोळीबार सत्र सुरुच; ‘दहशती’साठी केला गोळीबार! तिघांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

पुण्यात गोळीबार सत्र सुरुच; ‘दहशती’साठी केला गोळीबार! तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वारजे माळवाडीत दहशतीसाठी तरुणांनी भर चौकात नागरिकांसमोरच रस्त्यावर तीन गोळ्या झाडल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांच्या झाडाझडतीला अन् समोर उभा करून ‘पोलिसी समज’, ‘परेड’ आणि ‘हजेरी’ला गुन्हेगारांकडून आव्हान दिले जात असल्याचे वारंवार होणार्‍या घटनांवरून दिसत आहे. मागील पंधरवड्यात शहरात सलग चार गोळीबारांच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतरही गोळीबाराचे प्रकार थांबताना दिसून येत नाहीत. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई हेमकांत पवार यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार, तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. शहराच्या कात्रज, धायरी, नर्‍हे, वारजे, उत्तमनगरच्या परिसरात बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्याने या भागात मंगळवारी दिवसभर मतदानाची लगबग होती. त्यामुळे पुणे पोलिसांकडून या भागात गेल्या दोन दिवसांपासून चोख बंदोबस्तही ठेवला होता. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री मोठी गस्तदेखील घालण्यात आली होती. मंगळवारचा दिवस शांततेत पार पडला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतरर पुणे पोलिसांचा बंदोबस्तही संपला. मात्र, त्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांनी दहशत माजविण्यास सुरुवात केली.

नागरिक दिवसभराच्या मतदानाची चर्चा करत असताना साधारण पावणेअकराच्या सुमारास वारजे माळवाडीतील रामनगरमधील भीमशक्ती चौकात तीन तरुणांनी अचानक येऊन नागरिकांसमोरच रस्त्यावर एकापाठोपाठ एक अशा तीन गोळ्या झाडल्या. वरिष्ठ निरीक्षक मनोज शेडगे, पोलिस निरीक्षक नीलकंठ जगताप व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पाहणीत पोलिसांना दोन गोळ्यांच्याच पुंगळ्या दिसून आल्या आहेत. त्यामुळे दोन गोळ्या झाडण्यात आल्याचा संशय आहे. बुधवारी दुपारपर्यंत गोळीबार करणार्‍यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता.

…गुन्हेगारीचा आलेख चढताच

शहरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, तसेच वाढत्या गुन्हेगारी व गोळीबाराच्या घटना पाहता पोलिसांनी गुन्हेगारांची चौकी स्तरावर झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी आयुक्तालयात बोलावून परेड घेतली होती. त्यानंतरही गोळीबार, तोडफोड व दहशत माजवणे अशा घटना सुरूच असल्याचे दिसून आले. या गुन्हेगारांवर वचक बसविण्याचा प्रयत्न पुणे पोलिस करत आहेत. पण, गुन्हेगारीचा आलेख चढताच आहे.

गोळीबाराची घटना टाळण्यासाठी उपायुक्तांची नेमणूक

मंगळवारीच बारामतीचे मतदान पार पडले. शहराचा काही भाग या मतदारसंघात येतो. त्यानुसार, पुणे पोलिसांनी शहरात गोळीबार होऊ नये आणि अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सोमवारी वरिष्ठ अधिकार्‍यांना रात्रपाळीला पेट्रोलिंग व गस्त घालण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यात गोळीबार टाळण्यासाठी एका उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांचीही खास नेमणूक केली होती. त्यानंतरही गोळीबाराची घटना घडली.

असा केला गोळीबार..!

मतदानाचा दिवस असल्याने काहीजण भीमशक्ती चौकात जेवणानंतर गप्पा मारत बसले होते. अचानक तीन तरुण साधारण पन्नास मीटर अंतरावरून पायी चालत चौकात आले. त्यांनी चौकात उभे राहत रस्त्यावर गोळ्या झाडल्या. नागरिकांची भंबेरी उडाली. तरुणांनी गोळ्या झाडल्यानंतर ते तसेच पुढे पार्क केलेल्या दुचाकीवरून पळून गेले. ते कात्रज बायपास रस्त्याने पळून गेल्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button