मुंबई : अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आक्रोश आंदोलन | पुढारी

मुंबई : अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आक्रोश आंदोलन

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानात आज (दि.३) एक दिवसीय धरणे आंदोलन केले. राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे नेते एम. ए. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले.

राज्यात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी असून सेविकांना दरमहा 8500 रुपये तर मदतनिसांना 4450 रुपये दरमहा मानधन मिळते. त्यांच्या मानधनामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वाढ केलेली नाही. प्रचंड महागाई असताना त्यांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करण्यात यावी. महाराष्ट्र सरकार मानधन वाढविण्याबाबत वेळ काढूपणा करीत आहे.

तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, केरळ या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जास्त मानधन मिळते. परंतु, महाराष्ट्र प्रगतशील राज्य असतानाही या ठिकाणी तुटपुंजे मानधन दिले जाते. तरी मानधनात भरीव स्वरूपात वाढ जाहीर करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी केली.

राज्यात 13 हजार मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या सेविकांना 5900 दरमहा मानधन मिळते. तर नियमित अंगणवाडी सेविकांना 8500 मानधन मिळते. तरी समान काम समान वेतन या न्यायाने मिनी अंगणवाडी सेविकांना सेवाशर्तीचे पूर्ण फायदे देण्यात यावेत. अंगणवाडी केंद्राची नोव्हेंबर 2021 पासून भाड्याची रक्कम देण्यात यावी. मोबाईल रिचार्जचे पैसे ऑक्टोबर 2021 पासून देण्यात यावेत. सीबी योजनेचे कामाचे पैसे मिळावेत, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस ब्रिजपाल सिंह यांनी यावेळी केली.

हेही वाचा :   

Back to top button