ग्रामपंचायतीला नेता पडला ! आता सुरू आहे दिलेल्या पाकीटांची वसूली | पुढारी

ग्रामपंचायतीला नेता पडला ! आता सुरू आहे दिलेल्या पाकीटांची वसूली

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत निवडून आलेल्यांची दिवाळी गोड झाली; परंतु जे पराभूत झालेत त्यांचे दिवाळे निघाले आहे. काही गावांत निवडणूक निकालानंतर वादाचे प्रसंग निर्माण झाले, तर पडलेल्या उमेदवा—ांकडून रस्त्यांची आडवाआडवी करून निवडणुकीत दिलेल्या पाकिटांची वसुली सुरू केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. तालुक्यातील ज्या गावात एमआयडीसी व गुंठेवारी पद्धतीने नागरिकरण वाढले त्या गावातील निवडणुका तालुक्यात गाजल्या आहेत. विशेष करून सातकरस्थळ,संतोषनगर,वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव, वाळद, सांडभोरवाडी, निघोजे, देशमुखवाडी आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत. दिवाळीपूर्वीच मतदारराजांची निवडणुकीत दिवाळी झाली. ‘मुह मांगो दाम और हमारा बटन दाब’ तसेच ‘खावा मटण आणि दाबा बटण’ अशा पद्धतीने उमेदवारांनी मतदारांवर वारेमाप पैसा खर्च केल्याने निवडणुका चुरशीने झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

संबंधित बातम्या :

बाजार समिती निवडणुकीत ज्याप्रकारे कोटींचे आकडे ऐकायला मिळाले तशीच परिस्थिती सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत झाली. त्यामुळे भविष्यातील होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती,नगरपरीषद निवडणुका सोप्या नाहीत हे दिसून आले आहे.
वाकी बुद्रुक गावात मतदान दिवशी एका वस्तीत रस्त्यावर गुलाल,हळद,कुंकू व लिंबू टाकून अंडी फोडली होती. मतदान केंद्राबाहेर अंगाराधुपारा तोंडाने फेकल्याचे काहींनी सांगितले. एका गावात पडलेल्या उमेदवारांनी वाटलेल्या पाकिटांची फोन करून चक्क वसुली सुरू केली तसेच आपल्या हद्दीतील रस्त्याला चर खोदले, तर काही ठिकाणी रस्त्याला दगडगोटे लावून आडवाआडवीदेखील सुरू केली. परवानगीचे कारण पुढे करून विजयी मिरवणुकीतील डीजे बंद करण्याचा प्रयत्नसुद्धा झाला.

307 ची केस मिटवूनही काही फायदा नाही
पूर्वीच्या वादामुळे निवडणुकीत मतदानाचा फटका बसू नये म्हणून एका गावात 307 ची केस आपापसात बसून दोन्ही पार्ट्यांनी मिटविली. त्यासाठी समोरच्याला अक्षरशः लाखो रुपये दिल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार समजताच प्रतिस्पर्धी उमेदवारानेदेखील शंभर एक मतांचा फटका बसू नये म्हणून बक्कळ पैसे दिल्याची चर्चा आहे. मात्र, निवडणुकीत फायदा दुसर्‍याच उमेदवाराचा झाला.

Back to top button