Babanrao Dhakne: माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन | पुढारी

Babanrao Dhakne: माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क: माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे आज (दि.२७) निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मराठवाड्याच्या राजकारणातील कणखर नेतृत्त्व म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. अहमदनगर, बीड जिल्ह्यात ढाकणे यांचा दांडगा जनसंपर्क होता. (Babanrao Dhakne)

जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास होता. वांबोरी चारीसाठी त्यांनी वीस वर्षे लढा दिला. 1978 मध्ये ते लोकांनी वर्गणी करून त्यांना पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून दिले. राज्याच्या सार्वभौम सभागृहात पाथर्डी तालुक्याच्या मूलभूतप्रश्नी पत्रके भिरकावल्याप्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या ढाकणे यांना सात दिवसांची तुरूंगवासाची शिक्षा दिली होती. पुढे ते त्याच सभागृहाचे सदस्य झाले. 1981 ते 1982 या काळात ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

बॅरिस्टर अ.र.अंतुले, बाबासाहेब भोसले या दोन मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली. मंडल आयोगाच्या शिफारसी राज्याने तत्काळ स्वीकारव्यात याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मुंबईतील अधिवेशनात 25 जुलै 1983 रोजी अध्यक्षांसमोरील राजदंड पळविला होता. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विधानसभेचे उपाध्यक्ष, बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. शेवगाव-पाथर्डीत त्यांनी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. निमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. मागील काही आठवड्यांपासून अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर त्यांना हृद्यविकाराच्या झटक्याने आज त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button