Pimpri News : सध्या तरी दररोज पाणीपुरवठा नाही; महापालिका आयुक्त शेखर सिंह | पुढारी

Pimpri News : सध्या तरी दररोज पाणीपुरवठा नाही; महापालिका आयुक्त शेखर सिंह

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. नव्याने निर्माण झालेल्या हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांना दररोज 90 लिटर पाणी दिले जात आहे. शहरासाठी हे पाणी पुरेसे आहे. असे असले तरी, सध्या तरी दररोज पाणीपुरवठा करता येणे शक्य नाही, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी गुरुवारी (दि.26) स्पष्ट केले. पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. तसेच, आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी घेतले जात आहे.

अशी सकारात्मक परिस्थिती असताना शहराला दररोज पाणीपुरवठा करता येणार का, असे प्रश्न शहरातून उपस्थित केला जात आहे. त्यासंदर्भात विचारले असता आयुक्त सिंह बोलत होते. ते म्हणाले की, पवना धरणातून दररोज 500 एमएलडी पाणी घेतले जात आहे. तर, निघोजे बंधार्‍यातून दररोज 100 एमएलडी पाणी घेतले जात आहे.तसेच, एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी घेत आहोत. दोन दिवसाला पुरेल इतके पाणी एका दिवसात दिले जात आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा केला जात आहे.

पुरेसे पाणी मिळत असल्याने सध्या पाण्याबाबत तक्रारी कमी आहेत. भामा आसखेड व आंद्रा धरणातून एकूण 267 एमएलडी पाणी आणण्यासाठी जलवाहिनी टाकणे, जलउपसा केंद्र आदी कामे वेगात पूर्ण केली जात आहेत. ही सर्व काम दोन वर्षांत पूर्ण होतील. ते पाणी उपलब्ध होईपर्यंत शहराला दिवसाआडच पाणीपुरवठा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरच पवना जलवाहिनीची निविदा काढू

पवना बंद जलवाहिनीवरील स्थगिती राज्य शासनाने 8 सप्टेंबर 2023 ला उठवली आहे. बारा वर्षानंतर सर्वच परिस्थिती बदलली आहे. दर वाढले आहेत. त्यांचा विचार करून या प्रकल्पासाठी नव्याने निविदाप्रक्रिया राबविणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या अनुदानातून हा प्रकल्प केला जाणार आहे. त्यामुळे शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढायची की नाही, हा निर्णय घेतला जाणार आहे, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले. या कामाचे नव्याने सर्वेक्षण तसेच, आराखडा करण्यासाठी महापालिकेने पूर्वीच सल्लागार नेमला आहे.

हेही वाचा

Rise Up Season 2 : ‘राईझ अप सीझन 2’ कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Nashik Crime : नगरसूल दरोड्यातील नऊ संशयित आरोपी जेरबंद 

मलोलीत सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण

Back to top button