Saudi Arabia : ‘संवाद आणि मुत्सद्देगिरी’ शांततेसाठी हाच एकमेव मार्ग – अजित डोवाल | पुढारी

Saudi Arabia : 'संवाद आणि मुत्सद्देगिरी' शांततेसाठी हाच एकमेव मार्ग - अजित डोवाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासून भारताने शांततेच्या प्रयत्नासाठी या दोन्ही देशांशी नियमितपणे सर्वोच्च पातळीवर सहभाग घेतला आहे. भारत संयुक्त राष्ट्रांच्या सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यातील तत्त्वांवर आधारित जागतिक व्यवस्थेचे समर्थन करतो. सर्व राज्यांनी सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर अपवाद न करता कायम ठेवला पाहिजे, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी शनिवारी सांगितले.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सौदी अरेबियाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि इतर अधिकाऱ्यांच्या शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. युक्रेन शांतता चर्चेत सहभागी होण्यासाठी ते शनिवारी (दि.५) सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे पोहोचले. सौदी अरेबियातील भारताचे राजदूत सुहेल खान आणि कौन्सुल जनरल मोहम्मद शाहिद आलम यांनी जेद्दाह विमानतळावर डोवाल यांचे स्वागत केले. रशियासोबत सुरू असलेल्या युक्रेन संघर्ष, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या शांतता योजनेवर चर्चा करण्यासाठी जेद्दाह या शहरामध्ये ही बैठक आयोजित केली आहे. (Saudi Arabia )

रशिया-युक्रेन संघर्षाबाबत भारताचा नेहमीच  विश्वास आहे की हा संघर्ष संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवला गेला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटले आहे की, भारत संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी वाट्टेल ते करण्यास तयार आहे.

ते पुढे म्हणाले की, सर्वांचा सहभाग आणि समावेश असलेले सर्व शांततेचे प्रयत्न न्याय्य आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि म्हणूनच भारत जेद्दाहमधील बैठकीत सहभागी झाला.

“संपूर्ण जग आणि विशेषतः ‘जागतिक दक्षिण’ परिस्थितीचा फटका सहन करत आहे. भारत युक्रेनला मानवतावादी सहाय्य आणि जागतिक दक्षिणेतील शेजारी देशांना आर्थिक सहाय्य प्रदान करत आहे. भारताचा दृष्टिकोन संवाद आणि मुत्सद्देगिरीला चालना देण्याचा राहिला आहे आणि राहील. शांततेसाठी हाच एकमेव मार्ग आहे,” असे डोवाल म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button