खासदार हेमंत पाटील यांच्या कामाचे श्रेय कुणीही घेऊ नये: राजू चापके यांचा विरोधकांना इशारा | पुढारी

खासदार हेमंत पाटील यांच्या कामाचे श्रेय कुणीही घेऊ नये: राजू चापके यांचा विरोधकांना इशारा

वसमत, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने वसमत विधानसभा क्षेत्रासाठी आजपर्यंत भरीव निधी मिळाला आहे. खासदार झाल्यानंतर सर्वात पहिले पूर्णा नदीवरील बॅरीजेस हा विषय लावून धरला होता. सततच्या पाठपुराव्यामुळे वसमत तालुक्यातील पोटा, पिंपळगाव कुटे आणि जोडपरळी गावच्या उच्चपातळी बंधाऱ्यास एका महिन्यापूर्वीच जलसंपदा विभागाच्या वतीने प्रशासकीय मान्यता आली आहे. या कामासंदर्भातील निविदा निघणार आहेत. त्याचे फुकटचे श्रेय कुणीही घेऊ नये, असा इशारा शिवसेनेचे वसमत तालुका प्रमुख राजू चापके यांनी विरोधकांना दिला. आज (दि.५) ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

खा.हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री यांच्या मध्यस्थीने जलसंपदा विभागातील प्रमुख अधिकारी यांची मुख्यमंत्री यांच्या दालनात बैठक घेऊन पिंपळगाव कुटे, जोडपरळी व पोटा उच्चपातळी बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न केले. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र या सारखी किचकट प्रक्रिया खा. पाटील यांनी अतिशय योग्य पद्दतीने हाताळून प्रमाणपत्र मिळवले. मुख्यमंत्र्यांनी कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांना प्रशासकीय मान्यता देण्याचे ५ जुलैरोजी आदेश दिले आहेत.

खा. पाटील यांच्या पुढाकाराने हिंगोली लोकसभा मतदार संघात आजपर्यंत दिवंगत बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र, लॅजिस्टीक पार्क, लायगो प्रकल्प असे अनेक महत्वाच्या विकास कामांसाठी भरघोस निधी आणला आहे. परंतु विरोधकांनी विकास कामांना टोकाचा विरोध करुन कामे थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या अनेक विकास कामाचे परस्पर नारळ फोडून स्वतःचा उदो उदो करुन घेण्यात धन्यता मानली आहे. परंतु, सर्वसामान्य जनतेस कळून चुकले आहे की, वसमत विधानसभा क्षेत्राच्या भरीव विकासाकरीता खा. पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे विरोधकांनी दुसऱ्याने केलेल्या विकास कामांचे श्रेय घेणे थांबविले पाहिजे, असे राजू चापके यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button