जळगाव : राज्यातील पहिला उष्माघाताचा बळी; शेतमजुराचा मृत्यू | पुढारी

जळगाव : राज्यातील पहिला उष्माघाताचा बळी; शेतमजुराचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सध्या जिल्ह्यातील तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे जीवाची लाही लाही होत आहे. परिणामी या वाढत्या तापमानामुळे राज्यातील पहिला उष्माघाताचा बळी पाचोरा तालुक्यात गेला असून शेतात काम करताना एका शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (36) हा शेतमजूर शेतात काम करत होता. उन्हामुळे त्याला चक्कर आल्याने तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रेमसिंग हा शेतीमजुरीचे काम आणि जेसीबी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सकाळी शेती कामासाठी गेला असता दुपारी शेतात काम करताना चक्कर आली आणि त्याची शुद्धच हरपली. चव्हाण शेतात बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर त्याच्या तोंडावर पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न सोबत असलेल्या दुसऱ्या मजुराने केला. परंतु प्रेमसिंग याने कोणतीही हालचाल केली नाही किंवा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर चव्हाणला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. प्रेमसिंग यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा:

Back to top button