Pro Hockey League : भारतीय पुरूष संघाकडून अर्जेंटीना पराभूत; महिला संघाकडून हाराकिरी | पुढारी

Pro Hockey League : भारतीय पुरूष संघाकडून अर्जेंटीना पराभूत; महिला संघाकडून हाराकिरी

पुढारी ऑनलाईन डेस्क | Pro Hockey League : भारतीय पुरुष संघाने बुधवारी (दि.22) झालेल्या एफआयएच प्रो हॉकी लीग सामन्यात अर्जेंटीनाचा पराभव केला. निर्धारित वेळेत सामना 2-2 असा बरोबरी सुटल्याने सामना पेनल्टीवर खेळवण्यात आला. यामध्ये भारतीय संघाने अर्जेंटीनाचा 5-4 अशा फरकाने पराभव केला. भारताकडून मनदीप सिंग 11 व्या मिनिटाला तर, ललित कुमार उपाध्यायने गोल केले, तर अर्जेंटिनाकडून लुकास मार्टिनेझ आणि टॉमस डोमेने गोल केले.

शूटआऊटमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन तर अभिषेकने एक गोल केला. पूर्वार्धात भारत आणि अर्जेंटिना यांच्यात चुरशीची सामना झाला. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये वर्चस्व गाजवले, परंतु, अर्जेंटिनाने पुढील 15 मिनिटांत चांगला खेळ करत गोलची परतफेड केली.

भारतीय महिला संघाकडून हाराकिरी

महिला हॉकी संघाला एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये अर्जेंटिनाकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला. अर्जेंटिनाकडून ज्युलिएटा यांकुनास ने दोन गोल केले. तर, ऑगस्टिना गोर्झेलानी, व्हॅलेंटिना रापोसो, व्हिक्टोरिया मिरांडा यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारतीय संघ स्पर्धेत प्रथमच नवीन प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या प्रशिक्षणाखाली खेळत आहे. भारताचा पुढील सामना यजमान बेल्जियमशी होणार आहे.

Back to top button