सांगली : भेसळप्रकरणी अरविंद दूध संकलन केंद्राचे गोदाम सील; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सांगली : भेसळप्रकरणी अरविंद दूध संकलन केंद्राचे गोदाम सील; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Published on
Updated on

विटा: पुढारी वृत्तसेवा : गायीच्या आणि म्हशीच्या दुधात रिफाइन्ड सोयाबीन तेल आणि पावडर भेसळ केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील करंजे (ता. खानापूर) येथील अरविंद दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश साळुंखे (रा. हिवतड, ता. आटपाडी) यांनी तक्रार दाखल केली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील करंजे येथील अनिल निवृत्ती माने यांच्या अरविंद दूध संकलन केंद्रामध्ये गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये काहीतरी भेसळ सुरू असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश साळुंखे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी खात्री करण्यासाठी या केंद्राला भेट दिली असता तेथील दूधाला विशिष्ट प्रकारचा रंग आणि वास येत असल्याचे जाणवले. तसेच त्यांनी दुधात भेसळ होते, हे प्रत्यक्ष पाहिले, शिवाय खानापूर येथील एका दुकानातून भेसळकारी पदार्थ तसेच रिफाइंड सोयाबीन तेल या दूध केंद्राकडे आणले जात असल्याचे सीसीटी व्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले. त्यानंतर त्यांनी सांगलीच्या अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती.

त्यावरून अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी एन. एस.मसारे यांनी आपल्या पथकासह मंगळवारी (दि.११) करंजे येथे येऊन अरविंद दूध संकलन केंद्रावर धाड टाकली. यावेळी या पथकास या दूध संकलनामध्ये तसेच अनिल माने यांच्या घरात आणि गोदामामध्ये दूध भेसळीसाठी वापरले जाणारे २५ हजार ६६५ रुपयांचे १५० किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल, १० किलो डेअरी परमिएट पावडर (किंमत ९ हजार ८००रुपये) आणि ५ हजार ४५० रुपये किमतीचे १०५ लिटर भेसळकारी सोल्युशन आढळून आले. शिवाय ८८ लिटर गायीचे अंदाजे किंमत ३ हजार ८० रुपये आणि ८०० लिटर म्हशीचे दूध असा साठा आढळला.

खानापूर येथील मे. उदयकुमार रामलिंग कोरे यांच्या दुकानातून अरविंद दूध संकलन केंद्रास रिफाईन्ड सोयाबीन तेलाची विक्री झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून मे उदयकुमार रामलिंग कोरे या दुकानाची ही तपासणी करण्यात आली. यावेळी या दुकानातील रिफाइन्ड सोयाबीन तेलाचा नमुना विश्लेषणा करीता घेवून उर्वरीत २८३ किलो ४०० ग्रॅम चा ४६ हजार १९५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

भेसळ केलेले दूध अनिल माने हे निमणी (ता. तासगाव) येथील मिल्क शाईन फुड्स या शीतकरण केंद्रास विक्री करीत होते. त्यामुळे येथील गाय दूध व म्हैस दूधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. अरविंद दूध संकलन केंद्राचे गोदाम सील करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मसारे यांनी दिली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news