संभाजीनगरपेक्षा नागपूरमधील मविआच्या सभेला लाखोंंच्या संख्येने गर्दी होणार : अरविंद सावंत | पुढारी

संभाजीनगरपेक्षा नागपूरमधील मविआच्या सभेला लाखोंंच्या संख्येने गर्दी होणार : अरविंद सावंत

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : संभाजीनगरपेक्षा नागपूरला मविआची जबरदस्त सभा होणार, लाखोंंच्या संख्येने गर्दी होणार यात कुठलीही शंका नाही. अद्याप आमचे जागावाटप ठरले नसले तरी विदर्भात आम्ही गतवैभव मिळवू असा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केला. सभेचा, गर्दीचा अंदाज आल्यानेच अनेकांच्या पोटात गोळा उठला असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेचे नेते विनायक राऊत आज (दि. ११) नागपुरातील वज्रमूठ सभा होत असलेल्या मैदानाची पाहणी, बैठकीसाठी आलेले होते, या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, आमदार सुनील केदार तसेच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. आम्हाला सभेसाठी परवानगी मिळालेली आहे. क्रीडांगण खराब होणार नाही, उलट खेळाडूंना अधिक सुविधा मिळतील असा आमचा प्रयत्न आहे. यामुळेच कितीही काळ्या मांजरी आडव्या आल्या तरी मविआची नागपुरातील सभा जंगी होणार असा दावा सावंत यांनी केला. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असेही स्पष्ट केले.

आमची सभा होऊच नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संभाजीनगरची सभा होऊ नये म्हणून प्रयत्न झाला. नागपुरात महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर त्यांना धक्का बसणार असल्याने सभेला विरोधासाठी रोज नौटंकी सुरू आहे. मात्र, सर्व अडचणींवर मात करीत ही सभा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा देणारे ठरेल.

शरद पवार-उद्धव ठाकरे भेट संदर्भात सावंत म्हणाले, महाविकास आघाडीत विचारांचे आदान प्रदान होण्यासाठी ही भेट होती. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बेताल वक्तव्ये करीत आहेत. दुर्दैवाने हा प्रकार महाविकास आघाडीत होत नाही. महाविकास आघाडीत कुठलीही बिघाडी नाही. चर्चा करणारे हे मिंधे गट आणि भाजप आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना विश्वासात घेतले नाही, यासंबंधी बोलताना शरद पवार साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. संपूर्ण देशात शरद पवार यांचे एक वेगळे स्थान आहे. भाजप-मिंधे गट देव पाण्यातच ठेवून आहेत. दरम्यान, पापी लोकांना अयोध्येला गेल्यावर सद्बुद्धी येईल असे वाटले होते, मात्र त्यांना दुर्बुद्धी सुचलेली आहे. तिथे जाऊन त्यांनी दर्शन घेण्याऐवजी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाने दगड फोडण्याचे काम मिंधे गटाने केले असा आरोप सावंत यांनी केला.

Back to top button