नाशिक : शिवसेना सुसज्ज कार्यालयाचे आज लोकार्पण | पुढारी

नाशिक : शिवसेना सुसज्ज कार्यालयाचे आज लोकार्पण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात शिवसेनेने आपल्या कार्याचा ठसा उमटवायला प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात विकासकामांचा बार उडवून देतानाच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शहरात मायको सर्कल परिसरात पक्षाचे अद्ययावत प्रशस्त कार्यालय तयार करण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि.2) सकाळी 11 ला कार्यालयाचे लोकार्पण करण्यात येईल, माहिती पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रीय प्रवक्ते नरेश म्हस्के, पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेप्रसंगी सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित होते. तब्बल 2200 स्क्वेअर फुटाच्या कार्यालयात पदाधिकार्यांना कामकाज करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. बैठक हॉल व वॉर रूमचीही तेथे व्यवस्था आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्ष असतील. त्यात प्रामुख्याने वैद्यकीय कक्ष, विधी सल्ला कक्ष, सहकार सल्ला कक्ष, ग्राहक संरक्षण आणि सरकारी योजनांची माहिती देणारा कक्ष असेल, असेही बोरस्ते यांनी सांगितले. शिवसेनेच्या नव्या कार्यालयात वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यात गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचारासह सर्वसामान्य परिस्थितीच्या रुग्णांना उपचार प्रणालींची योग्य माहिती दिली जाईल. वैद्यकीयबाबतीत शासकीय योजनांच्या सुयोग्य वापरासाठी अर्ज कसे करावे, योजनेचा लाभ कसा घ्यावा याचीही माहिती मदत कक्षात दिली जाईल.

पालकमंत्र्यांचा जनता दरबार
शिवसेनेच्या अद्ययावत कार्यालयात पालकमंत्री महिन्यातून एकदा जनता दरबार घेतील. तसेच खा. गोडसे, आ. कांदे यांच्यासह नाशिक शहर व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख हेही नागरिकांच्या प्रश्नांसाठी कार्यालयात उपलब्ध असतील, अशी माहिती अजय बोरस्ते यांनी दिली.

हेही वाचा:

Back to top button