आमची झाकणं उडविण्यापेक्षा तुमचीच जपा : पालकमंत्री विखे

आमची झाकणं उडविण्यापेक्षा तुमचीच जपा : पालकमंत्री विखे
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : 

संगमनेर तालुक्यात ठेकेदारी बंद केली. वाळू बंद केली. अस्वच्छ पाणी बंद केले. याचे कुणाला दु:ख वाटत असले तरी, मला त्याची फिकीर नाही. जनतेच्या हितासाठी ठेकेदारांवर आमची दहशत कायम राहणार आहे, असा इशारा देत, तुम्ही आमच्या दहशतीची झाकणं उडविण्यापेक्षा तुमच्या कुकरच्या शिट्ट्या आणि झाकणं जपा, असा उपरोधिक सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना देत, राहात्यातील त्यांच्या सभेतील भाषणाचा खरपूस समाचार घेतला.

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 27 कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपुजन समारंभ व 1 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने हनुमान मंदिरासमोर झालेल्या जाहीर सभेत मंत्री विखे बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते बापुसाहेब गुळवे, वसंतराव देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहराध्यक्ष श्रीराम गणपूले, सुदामराव सानप, दिलीप शिंदे, जनार्दन आहेर, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, संतोष रोहोम, शरद थोरात, कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णा दिघे, उपसरपंच मोहन वामन, प्रवरा पतसं स्थेचे चेअरमन, भाजप उपाध्यक्ष राहुल दिघे, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, चेअरमन पोपटराव कोल्हे, व्हा. चेअरमन सोपान खुळे, दादासाहेब गुंजाळ, अमोल दिघे, सतीश वाळुंज यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, जलजीवन मिशन योजना हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या योजनेची कामे चांगली व्हावीत, ही ठेकेदारांची जबाबदारी आहे. त्यामुळे या योजनेत कोणी गैरप्रकार केल्यास अजिबात खपवून घेणार नाही. सरकार कुणाचीच गय करणार नाही, अशी तंबी मंत्री विखे यांनी ठेकेदारांना दिली.

अनेकांना आता सत्ता गेल्याचे दु:ख लपविता येत नाही, म्हणून स्वतःच्या अस्तित्वासाठी काही जणांनी फक्त महाविकास आघाडीचा उपयोग करणे सुरु केले आहे. वैफल्यग्रस्त आणि नैराष्येच्या भावनेतून त्यांची फक्त पोपटपंची सुरु आहे. अनेक वर्षे केवळ ठेकेदार अन वाळू माफीयांना पाठिशी घालण्याचे काम झाले. आता ठेकेदारांना त्यांच्या चुका दाखवयाला सुरुवात केली याचे, नेत्यांनाच दु:ख होवू लागले आहे असे म्हणत, तुम्ही नेमके समर्थन कोणाचे करता, असा प्रश्न मंत्री विखे यांनी आ. थोरात यांना उपस्थित केला.

महसूल विभागाच्या माध्यमातून वाळूचे धोरण आपण आणले. यामध्ये सामान्य माणसाचे हित पाहिले आहे. वाळू तस्करी आता पुर्णतः हद्दपार होईल, असा विश्वास व्यक्त करताना सामान्य माणसाच्या घरापर्यंत अवघ्या 650 रुपयात वाळू देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत वाळू तस्क रांनी कित्येक सामान्य माणसाचे बळी घेतले. वाळू तस्करीतील ही गुंडगिरी संपविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा गर्भित इशारा महसूल मंत्री विखे यांनी वाळू माफियांना दिला

कोविड संकटात देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे दिलासा मिळाला. मागील अडीच वर्षे सरकारचे अस्तित्वही दिसले नव्हते. जिल्ह्याला तीन मंत्री होते, परंतू एकही मंत्री जनतेपर्यंत पोहोचला नाही. स्वतं:ची रुग्णालये असूनही कोविड सेंटर हे सुरु करु शकले नाही, अशी टीकस्त्र मंत्री विखे यांनी विरोधकांवर सोडले.

जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध झाला..!
सरकारने गुढीपाडवा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती
निमित्त 'आनंदाचा शिधा' देण्याचा निर्णय घेतला. या किटचे वितरण मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले. जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा आता उपलब्ध झाला आहे. याचा लाभ सर्वच घटकांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, सामान्य माणसाला न्याय
देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकाच अर्जावर आता दाखले उपलब्ध होणार आहेत. याबाबत 15 दिवसांमध्ये अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news