नाशिक : नासर्डी नदीत सापडले पुरुष जातीचे मृत अर्भक | पुढारी

नाशिक : नासर्डी नदीत सापडले पुरुष जातीचे मृत अर्भक

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

सातपूर औद्योगिक वसाहतीमधील स्वारबाबानगरमध्ये राधाकृष्ण हाॅटेल मागून, कांबळेवाडी परिसरातून वाहत जाणाऱ्या नासर्डी नदीच्या पात्रात पुरुष जातीचे एक मृत अर्भक सापडले. नुकतेच जन्मलेल्या अर्भकाला फेकणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, नासर्डी नदीपात्रातून अर्भक वाहून जात असल्याचे परिसरातील गौतम निकम, राजू पांडे, गणेश रोकडे यांनी रविवार (दि.५) दुपारी ३.३० च्या सुमारास बघितले. त्यांनी याबाबत तत्काळ सातपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर, पोलिस उपनिरीक्षक राजू पठाण आदी अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत मृत अर्भकाचा पंचनामा केला. मृत अर्भक हे जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अर्भक पुरुष जातीचे आहे. तर अनैतिक संबंधातून अर्भकाचा जन्म होऊन कोणालाही कळू नये यासाठी नदीपात्रात फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत अर्भक पाच ते सहा तासांचेच असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, माहिती कळाल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वीदेखील सातपूर शहरातील बारागाड्या यात्रोत्सव गुढीपाडव्याच्या यात्रेमध्ये गावातील एका जुन्या शाळेच्या इमारतीत अर्भक सोडून देण्याची घटना घडली होती. त्यामुळे त्या अर्भकाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचे सांगितले जाते. श्रमिकनगर, बजरंगनगर, महादेवनगर अशा अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याचे सांगण्यात येते. मात्र, या घटनांमधील संशयितांचा अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

सातपूर व नाशिक परिसरात आपापल्या परिसरात किंवा वसाहतीत महिला प्रसूत होऊन मूल दगावल्याची घटना घडल्याचे असे कोणते कारण असल्यास त्वरित सातपूर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. – सतीश घोटेकर, पोलिस निरीक्षक, सातपूर पोलिस ठाणे

हेही वाचा:

Back to top button