Shital Mhatre : ‘ते’ ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना? की फक्त ‘कर नाटक’? शीतल म्हात्रेंचे खोचक ट्विट | पुढारी

Shital Mhatre : 'ते' ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना? की फक्त 'कर नाटक'? शीतल म्हात्रेंचे खोचक ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ते ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना ? की फक्त “कर नाटक”? असे खोचक ट्विट शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.  त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही ट्विट करत शरद पवारांना डिवचले आहे.

Shital Mhatre : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्‍न

गेले काही दिवस कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्‍नावरुन महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाप्रश्नावर केलेल्‍या विधानांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न समन्वयक चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि उच्चाधिकार समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांचा मंगळवारी (दि.६) बेळगाव दौरा नियोजित होता. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आला. मंगळवारी (दि.६) बेळगाव-हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी काही वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे दोन्ही राज्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्‍नावरुन माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, कर्नाटकच्‍या मुख्‍यमंत्र्यांनी महाराष्‍ट्राच्‍या संयमाची परीक्षा बघू नये, कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर 48 तासांत मार्ग काढला  नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह, नेत्यांनी एकत्र येत, यावर मार्ग काढावा, असे आवाहनही त्‍यांनी केले होते.

Shital Mhatre : कर नाटक

यानंतर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत शरद पवारांना डिवचलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, “ते ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना ? की फक्त “कर नाटक”? तर भाजप नेते निलेश राणे यांनीही ट्विट केले आहे की, “ते पवार साहेब 48 तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं??”

या ट्विटची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. आता सर्वांच लक्ष शरद पवार कोणती भूमिका घेणार याकडे लागले आहे.

हेही वाचा

Back to top button