बंगळूर; पुढारी वृत्तसेवा: गदगमध्ये काही कन्नड संघटनांनी गुरुवारी निदर्शने करून हुल्लडबाजी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. महाराष्ट्रातून आलेल्या वाहनांना काळे फासले. यामध्ये एका एसटीचा समावेश आहे.
सकाळी काही कार्यकर्ते गदग शहरातील मुख्य चौकात आले. त्यांनी महाराष्ट्राविरोधी घोषणाबाजी सुरू केली.
काहींनी वाहनांवर चढून घोषणा दिल्या. महाराष्ट्राच्या वाहनांना लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न झाला. त्यावर काळे फासून कन्नड भाषेत मजकूर लिहिला. काहींनी हुल्लडबाजी करून रस्त्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. गेल्या काही दिवसांपासून सीमाप्रश्नी वादग्रस्त विधाने करण्यात आल्याने दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. कर्नाटकात महाराष्ट्रविरोधी वातावरण निर्माण झाले आहे.
सीमा वादात महाराष्ट्राने संयम पाळला आहे. मात्र कर्नाटकात धुडगूस सुरू आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नका. बेळगाव दोन मंत्री जाणार होते. पण, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिल्यानंतर आपले मंत्री घाबरले. अशा घाबरट सरकारकडून काय अपेक्षा ठेवाव्यात! आदित्य ठाकरे, शिवसेना नेते