काबूल येथून विशेष विमानाने भारतीय अधिकारी मायदेशात दाखल | पुढारी

काबूल येथून विशेष विमानाने भारतीय अधिकारी मायदेशात दाखल

काबूल; पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तान मधील काबूल येथून भारतीय अधिकाऱ्यांना घेऊन आलेले भारतीय हवाई दलाचे सी-१७ हे विमान आज सकाळी गुजरातमधील जामनगर येथे दाखल झाले. अफगाणिस्‍तान मधील भारतीय दुतावासातील कर्मचार्‍यांसाठी भारतीय हवाई दलाचे हे विशेष विमान काबूल येथून भारताकडे रवाना झाले होते. ते आज जामनगर येथे उतरले.

सकाळी अफगाणिस्‍तानमधील भारतीय नागरिकांना परत घेवून येणारे हे विशेष विमान अमेरिकी सैनिकांच्‍या संरक्षणात बाहेर काढण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

तालिबाननं अफगाणिस्‍तान वर आपली हुकूमत प्रस्‍थापित केली. तालिबानने सत्ता काबीज केल्‍याने देशभरात अराजक माजले आहे. शेकडो भयग्रस्‍त नागरिक अफगाणिस्तान सोडून पलायन करत आहेत.

भारतीय हवाई दलाच्‍या सी-१७ विमान आज काबूलहून भारताकडे रवाना झाले होते.

भारताचं हे विमान अमेरिकी सैनिकांच्‍या संरक्षणात बाहेर काढण्‍यात आलं आहे. या विमानात सुमारे १४० भारतीय आहेत.

भारतीय राजदूत आर. टंडन यांच्‍यासह इतर अधिकारी कर्मचार्‍यांना काबूलमधून परत भारतात आणण्‍यात आले आहे.

त्‍याचबरोबर तेथे अडकलेल्‍या सुरक्षारक्षकांनाही भारतात परत आणण्‍यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काबुलमध्‍ये सुमारे ५०० भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्वाना सी-१७ विमानाने भारतात परत आणले जात आहे.

अफगाणिस्‍तानमधील अराजक परिस्‍थिती असतानाही दुतावासात अडकलेल्‍या कर्मचार्‍यांना सुरक्षित मायदेशात आणण्‍यात भारताला यश आले आहे.

सोमवारी अफगाणिस्‍तानमधील हवाई वाहतूक पूर्णपणे बंद करण्‍यात आली. यामुळे हवाई प्रवास बंद झाला होता.

यानंतर पुन्‍हा हवाई प्रवास सुरु झाल्‍यानंतर केंद्र सरकारने प्राधान्‍याने अफगाणिस्‍तानमध्‍ये अडकलेल्‍या भारतीयांना परत आणत आहे.

अफगाणिस्‍तानमधील अराजक परिस्‍थितीमुळे भारताने व्‍हिसा नियमांमध्‍ये शिथिलता आणण्‍याचा निर्णय घेतला आहे.

अफगाणमधून नागरिकांना मायदेशात परत येण्‍यासाठी स्‍वंतत्र यंत्रणा कार्यन्‍वित करण्‍यात आली आहे. याला ‘ई – इमर्जेंसी एक्‍स -मिस व्‍हिसा असे नाव देण्‍यात आले आहे. अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्‍या सूत्रांनी दिली.

अफगाणिस्‍तानमध्‍ये अडकलेल्‍या सर्व भारतीयांना सुरक्षितरित्‍या देशात परत आणले जाईल, असा विश्‍वास केंद्र सरकारने व्‍यक्‍त केला होता.

परराष्‍ट्र मंत्रालयाने म्‍हटले होते की, अफगाणिस्‍तानमधील परिस्‍थितीत वेगाने बदल होत आहे. येथील घडामोडींवर आमची नरज आहे. येथे अडकलेल्‍या नागरिकांना सुरक्षितरित्‍या मायदेशी परत आणण्‍यात चर्चा सुरु आहे. परिस्‍थिती पाहता त्‍यांनी मायदेशात परत यावे, असे आवाहनही केंद्र सरकारने केले हाेते.

अफगाणिस्‍तानमधील शीख आणि हिंदू समुदायच्‍या प्रतिनिधींशी आम्‍ही सातत्‍याने संपर्कात आहेत.  तेथील भारतीय नागरिकांच्‍या सुरक्षेसाठी आम्‍ही सर्वोतपरी प्रयत्‍न करत असल्‍याचे परराष्‍ट्र मंत्रालयाने म्‍हटले होते.

त्‍यानुसार भारतीय हवाई दलाचे सी-१७ विमान काबूलला रवाना झाले हाेते. ते भारतात परतले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button