लघुग्रह धडकेने डायनासोरचे अवशेष अंतराळातही उडाले? | पुढारी

लघुग्रह धडकेने डायनासोरचे अवशेष अंतराळातही उडाले?

वॉशिंग्टन : लघुग्रह धडक आणि त्यामुळे झालेला डायनासोरच्या विविध प्रजातींचा अंत याबाबत सातत्याने नवे संशोधन होत असते. आता एका वैज्ञानिकाने म्हटले आहे की ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळे डायनासोरचे अवशेष अंतराळातही उडून गेले असावेत.

या सिद्धांताची पुष्टी करण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला व त्याचा व्हिडीओ आता ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक खेळण्यातील डायनासोर ट्रँपलीनवर उभा असलेला दिसतो.

त्यावेळी मोठ्या चेंडूसारखी वस्तू त्यावर पडल्याने खालील पृष्ठभूमी आधी खचून व नंतर उसळून वर आल्याने हा डायनासोर हवेत उडतो. वास्तवातही असे काही घडले असावे असे काही संशोधकांना वाटते. हा व्हिडीओला आतापर्यंत 1.4 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. काहींच्या मते, तर डायनासोरची हाडे चंद्रावरही आढळून येतील!

पुरस्कार विजेते सायन्स जर्नालिस्ट पीटर ब्रानन यांचे म्हणणे आहे की हा लघुग्रह इतका मोठ्या आकाराचा होता की तो पृथ्वीच्या वातावरणात येऊनही त्याचे फारसे नुकसान झाले नाही व तो वेगाने पृथ्वीवर आदळला. त्याच्यामुळे निर्माण झालेल्या दबावामुळे आकशात हवेची पोकळी निर्माण झाली आणि ती भरण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील हवा वर खेचली गेली. त्याबरोबरच पृथ्वीचे अनेक तुकडे व वस्तूही वर खेचल्या गेल्या.

Back to top button