पुण्यात मांजरीच्या उपसरपंचावर गोळीबार, गंभीर जखमी | पुढारी

पुण्यात मांजरीच्या उपसरपंचावर गोळीबार, गंभीर जखमी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मांजरीचे उपसरपंच पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना बुधवारी (दि.०४) रात्री घडली. हॉटेलमधील टेबलावर बसल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या मित्रांमध्ये कारणास्तव शाब्दिक वादावादी झाली. हा वाद वाढत गेला आणि याचे रूपांतर भांडणात झाले. धारवाडकर यांनी भांडणात हस्तक्षेप केला आणि ते हॉटेलमध्ये बाहेर पडताच त्याच्यावर अज्ञातांनी गोळीबार करत, दगड, विटांनी मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी धारवाडकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन मित्रांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम धारवाडकर हे काही जणांसह रात्री श्रीराम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडणे झाले. धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. भांडणानंतर घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघेजण मोपेडवरुन तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. ती गोळी धारवाडकर यांना लागली नाही. त्यानंतर त्यांनी तेथे पडलेल्या दगड, विटांनी धारवाडकर यांना मारहाण केली. दगड डोक्यात घातल्याने त्यात ते जबर जखमी झाले. त्यानंतर त्यांनी तेथे जमलेल्यांना धमकावून ते पळून गेले. लोकांनी धारवाडकर यांना तातडीने नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

याबाबत अण्णा धारवाडकर यांनी सांगितले की, या भांडणाशी आपला काही संबंध नव्हता. तो केवळ मी बसलेल्या टेबलावर बसला होता. चंद्रकांत घुले व नंदू शेडगे हे ओळखीचे असून त्यांच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीमुळे डोक्याला जखम झाली आहे. डॉक्टरांनी ८ ते ९ टाके घातले आहे. हडपसर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button