इचलकरंजी : मला जबाबदारीतून मुक्त करा; जलअभियंता सुभाष देशपांडे यांचा प्रस्ताव | पुढारी

इचलकरंजी : मला जबाबदारीतून मुक्त करा; जलअभियंता सुभाष देशपांडे यांचा प्रस्ताव

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा अनेक कटू प्रसंग अंगावर घेत शहराला दिवसाआड पाणी देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले जलअभियंता सुभाष देशपांडे यांनी मला जबाबदारीतून मुक्त करा, असा तडकाफडकी प्रस्ताव प्रशासनाकडे दिल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या जाचाला वैतागून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची पालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे.

देशपांडे सध्या निवडणूक, पाणीपुरवठ्याचे कामकाज पाहात आहेत. कृष्णा योजनेला गळती, पंचगंगा वारंवार बंद पडते तर कट्टीमोळा योजना सुरू करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर होते. शहराची चांगली जाण आणि पाणीपुरवठा योजनेचा अनुभव लक्षात घेऊन तत्कालीन पदाधिकार्‍यांनी देशपांडे यांच्याकडे जलअभियंता पदाचा अतिरिक्त पदभार अधिकृतरीत्या सोपवला. देशपांडे यांनी कृष्णा योजना सुरळीत सुरू तर ठेवलीच, पण माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांना सोबत घेऊन त्यांनी कट्टीमोळा योजनेतून पाणी उपसा सुरू करून दाखवला.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी जीर्ण झालेल्या पंचगंगाची दुरुस्ती करून तेथून ही पाणी उपसा सुरू ठेवला. यासाठी त्यांना पदरमोड केली. पण शहराला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके बसू दिले नाहीत. किमान पिण्यासाठी पाणी कमी पडू नये अशी त्यांची धडपड होती. असे असूनही एक अनुभवी जल अभियंत्याला पदमुक्त करा, असे सांगण्याची वेळ आली.

Back to top button