सातारा : अनैतिक संबंधाच्या कारणातून कोंडवेत वार करून एकाचा खून | पुढारी

सातारा : अनैतिक संबंधाच्या कारणातून कोंडवेत वार करून एकाचा खून

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीत फिरोज चांद मुलाणी (वय 37, सध्या रा. फरासवाडी, कोंडवे, ता. सातारा, मूळ रा. कडेगाव, जिल्हा सांगली) यांचा धारधार शस्त्राने खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकण्यात आला. दोन दिवसांपूर्वी खून झाला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी एलसीबी व तालुका पोलिसांनी एकाला अटक केली असून अनैतिक संबंधाच्या कारणातून खून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे.

शकील निजाम फरास (वय 42, रा. नेले, ता. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मृत फिरोज मुलाणी यांचा भाऊ अस्लम मुलाणी यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, खुनाची घटना सोमवारी घडली असून खून झाल्याचे मंगळवारी रात्री उशिरा समोर आले आहे. फिरोज मुलाणी हे त्यांच्या सासुरवाडीमध्ये कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी रात्री त्यांच्या भावाला फिरोज यांचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मध्यरात्री त्यांनी सातार्‍यात धाव घेतली. तोपर्यंत सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) पोनि किशोर धुमाळ व तालुक्याचे पोनि विश्वजित घोडके यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

फिरोज यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला झाला असून वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह सापडल्यानंतर सुरुवातीला त्याची ओळख पटत नव्हती. यामुळे ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या नेटवर्कमुळे काही तासांतच तो मृतदेह फिरोज मुलाणी यांचा असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी तपास गतिमान केला. फिरोज यांच्याबाबत माहिती घेतल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून तालुका व एलसीबी पोलिसांनी तपासासाठी कंबर कसली. फिरोज यांचे कडेगाव येथील कुटुंबीय सातार्‍यात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात खुनाची तक्रार दिली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर संशयिताची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली. संशयिताकडे प्राथमिक चौकशी केली असता ‘अनैतिक संबंधामध्ये फिरोज अडथळा ठरत होता. यामुळेच चिडून जाऊन खून केला,’ अशी कबुली शकील फरास याने पोलिसांना दिली.

दरम्यान, गुरुवारी संशयित आरोपीला सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोनि किशोर धुमाळ, पोनि विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि अभिजित चौधरी यांच्यासह पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button