...मग सतेज पाटील यांनी गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ का केली? - शौमिका महाडिक | पुढारी

...मग सतेज पाटील यांनी गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ का केली? - शौमिका महाडिक

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
ग्राहकांवर गोकुळची दरवाढ का? असा सवाल 2017 मध्?ये करणार्‍या सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये सत्तेवर येताच ग्राहकांवर दरवाढ का लादली याचा खुलासा करावा, असे जाहीर आव्हान गोकुळच्या संचालक शौमिका महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दूध उत्पादकांसोबत सत्ताधार्‍यांकडून झालेल्या विश्‍वासघाताची वर्षपूर्ती, असे सांगून त्यांनी कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक होताच ग्राहकांवर दरवाढ लादल्याचा आरोप केला.

टँकरबाबत बिनबुडाचे आरोप करून विश्वासघाताने त्यांनी गोकुळमध्ये सत्ता मिळविली. टँकरचा मुद्दा पहिल्याच बैठकीत आपण खोडून काढला. गोकुळच्या कारभाराची खरी माहिती जनतेसमोर येईल या भीतीने त्यांनी प्रशासन व अध्यक्षांवर माहिती देऊ नये यासाठी दबाव आणला. स्वच्छ कारभार असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सत्ताधारी का घाबरता? असा सवालही त्यांनी केला. कारभारात काटकसर केली तर ग्राहकावर बोजा टाकण्याची आवश्यकता नाही, असे म्हणणार्‍या सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये सत्ता येताच ग्राहकांवर बोजा का टाकला हे स्पष्ट करावे, असेही त्या म्हणाल्या.

महाडिक यांनी कधीही कारभारात हस्तक्षेप केला नाही असे गोकुळचे अनेक अधिकारी, कर्मचारी सांगतात. मात्र महाडिक यांचा विश्वासघात करून तिकडे गेलेल्या लोकांनी किमान आता तरी विचार करावा, असे महाडिक म्हणाल्या. टेंडरची प्रक्रिया पारदर्शी नाही. बाहेर लोकशाहीच्या गप्पा मारणार्‍यांची येथे हुकूमशाही आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. गोकुळमधील गेल्या 30 वर्षातील हिशेब सांगण्यास मी तयार आहे तुम्ही एक वर्षातील हिशेब सांगा, असे आव्हानही महाडिक यांनी दिले.तुम्ही कोणत्या अधिकारात उपस्थित? वार्षिक सभेला महाडिक का उपस्थित राहतात त्यांचा काय संबंध? असे प्रश्‍न विचारणारे सत्ता आल्?यावर मात्र अगोदरच खुर्चीत जाऊन बसले. सत्तांतरानंतरच्या पहिल्या सभेत आपण कोणत्या अधिकाराने गोकुळच्या सभेला तुम्ही उपस्थित राहिला, अशी विचारणा महाडिक यांनी केली. तुम्हाला पाहुणे म्हणून बोलावले असेल किंवा सत्ताधारी आघाडीचे नेते म्हणून खुर्चीत बसला असला तर त्याच अधिकाराने महाडिकही सभेला उपस्थित राहत होते, असे त्या म्हणाल्या.

Back to top button