Parliament Budget session : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून होणार सुरू | पुढारी

Parliament Budget session : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून होणार सुरू

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली :  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास (Parliament Budget session) येत्या ३१ जानेवारीपासून सुरुवात होणार असून १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती शुक्रवारी सूत्रांनी येथे दिली. पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत तर दुसऱ्या टप्प्यात ४ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत अधिवेशन होणार आहे. तारखांची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
(Parliament Budget session) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जाणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. तथापि कोरोना प्रतिबंधक उपाय योजत अधिवेशन घेतले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवनाची पाहणी करून एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला होता. संसदेतील चारशेपेक्षा जास्त कर्मचारी तसेच काही प्रमुख नेते देखील कोरोनाबाधित आहेत. अशा स्थितीत संसद कामकाजावर मोठ्या मर्यादा येणार आहेत.
आगामी संसद अधिवेशन सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने आवश्यक ते उपाय योजण्याचे निर्देश अलीकडेच राज्यसभेचे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मागील काही दिवसांत जे प्रमुख नेते कोरोनाबाधित झाले होते, त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश आहे.( Parliament Budget)
हेही वाचलत का?

Back to top button