'अंनिस' मुळे राज्यात 600 जणांना जटामुक्‍ती;अंधश्रध्देला दिली मूठमाती | पुढारी

'अंनिस' मुळे राज्यात 600 जणांना जटामुक्‍ती;अंधश्रध्देला दिली मूठमाती

सातारा : मीना शिंदेः सध्याच्या विज्ञान युगातही अज्ञान आणि अशिक्षीतपणामुळे अंधश्रध्देला थारा दिला जात आहे. प्रामुख्याने कष्टकरी समाजात आजही देवाचा प्रकोप होईल ही समजूत घर करुन आहे. केसातील जट काढल्यास देवाचा कोप होईल या समजुतीतून आरोग्य धोक्यात घातले जात आहे. मात्र, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूूलन (अंनिस) समितीने अशा नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांना भारमुक्‍त केले आहे. अंनिस तर्फे आजपर्यंत जिल्ह्यात 100 तर राज्यात 600 जणांना जटामुक्‍ती मिळाली आहे.

संगणकीकरणाच्या युगात अनेक जुनाट रुढी परंपरांना फाटा देत पुरोगामी विचारांची पाठराखन केली जात आहे. त्यातूनच वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारला जात आहे. विविध वैज्ञानिक संशोधनामुळे आज माणूस चंद्रावर पोहचला आहे. विविध यंत्रांचा शोध लागला असून घराघरात ती पोहचली आहेत.

चूल आणि मूल सांभाळणारी महिला आता सर्व क्षेत्रात पुढे आली आहे. हे जरी वास्तव असले तरी नाण्याला दुसरी बाजू ही आहे. समाजातील काही घटक आजही अज्ञान आणि अंधश्रध्देच्या जोखडात पिचत आहे. त्यामध्ये बहुतांश कष्टकरी समाजाचा समावेश आहे. या घटकांमध्ये आजही केसांच्या अस्वच्छतेमुळे डोक्यामध्ये तयार होणारी जटा आणि मग त्याला देवीचा प्रकोप हे नाव देवून ती वाढवली जात आहे. जट बहुतांशी महिलांच्या डोक्यात व क्वचितच पुरुषांच्या डोक्यात असते.

जट असलेल्या त्या महिलेचं समाजातर्फे होणारे शोषण ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. शोषणाच्या या कुप्रथेला छेद देण्याचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीचे प्रणेते स्व.नरेंद्र दाभोलकर मुळचे सातार्‍याचे असल्याने जिल्ह्यात अंनिसच्या चळवळीने चांगला जोर धरला आहे. जटेच्या अंधश्रध्देतून आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर येत असून तो दूर करण्यासाठी अंनिसने जटामुक्‍तीचे काम सुरु ठेवले आहे. त्यातूनच महाराष्ट्र अंनिसतर्फे जिल्ह्यात 100 तर राज्यात सुमारे 600 जणांना जटामुक्‍ती देण्यात आली आहे. कित्येक किलोचे ओझे डोक्यावर असल्याने अनेक महिलांना मानेच्या मणक्याचे आजार उद्भवले होते. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत असे. पण अंनिसच्या जटामुक्‍ती उपक्रमामुळे या महिलांना दिलासा मिळाला आहे.

जटामुक्‍ती करताना अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून समुपदेशनावर भर देण्यात येत आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने डोक्यात जटा आलेल्या महिलेची माहिती घेतली जाते मग ती जट काढण्याबाबत तिचे व तिच्या कुटुंबाचे प्रबोधन करुन तिला योग्य मार्गदर्शन करुन त्या पीडितेला जटामुक्‍त केले जाते. जटाधारी महिला व तिच्या कुटुंबाला समजावून सांगितले जाते.

या कामामध्ये अंनिसचे जिल्हास्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. दीपक माने, नंदिनी जाधव, वंदना माने, गणेश चिंचोले, प्रा. प्रवीण देशमुख, प्रशांत पोतदार, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, उदय चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत.

Back to top button