Benefits of Turmeric : हळदीचे उपयोग | पुढारी

Benefits of Turmeric : हळदीचे उपयोग

आपल्या घरातल्या मसाल्यांच्या पदार्थांमधला एक प्रमुख घटक म्हणजे हळद. हळद आपण स्वयंपाकात अगदी सवयीने आणि सरावाने वापरतो. फोडणी करायची असो की चिकन, मटण, माशाचं मॅरीनेशन करायचं असो; हळद वापरली नाही असं होतच नाही. अर्थात हळद अगदी पूर्वापार माणसाच्या दैनंदिन जगण्याचा भाग बनून गेलीय त्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हळदीची बहुगुणी वैशिष्ट्य. ( Benefits of Turmeric )

संबंधित बातम्या 

एखादी जखम हळदीमुळे लवकर भरून येते, याचा अनुभव आपल्यातल्या अनेकांनी घेतला असणार यात शंका नाही. अगदी पूर्वीच्या काळापासून जखम अथवा दुखापतीवर हळदीचा लेप लावून उपचार केले जात आहेत. हळदीमध्ये नैसर्गिक अँटी सेप्टिक आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे जखमांचं जंतूपासून संरक्षण होतं, वेदना व सूज आटोक्यात येण्याचा वेग वाढतो, दाह कमी होतो आणि जखम भरून येण्यास मदत होते.

विशेषत: श्वसनाची आणि सर्दी-कफची समस्या असलेल्या लोकांनी हळद-दूध प्यायल्याने त्यांच्या शरीरात उष्णता निर्माण होते, श्वसनमार्ग मोकळा होतो आणि छातीत साठलेला कफ कमी होण्यास मदत होते. ज्यांना सकाळी अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो, जळजळीमुळे अस्वस्थता येते त्यांना सकाळी उठल्यावर कोमट पाण्यातून हळद घेण्याचा सल्ला दिला जातो. आतड्यांची सूज कमी करण्यासही हळद हातभार लावते. हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी व्हायरल, अँटी फंगल, अँटी म्युटाजेनिक आणि अँटी इनफ्लेमेटरी गुणधर्म आढळून आले आहेत. हळदीमधले घटक मेंदूच्या पेशींना सुरक्षित ठेवण्यास साहाय्यभूत ठरतात. हळदीमुळे शरीरातली रोगप्रतिकारशक्ती वाढते तसंच रक्ताभिसरण सुधारतं. यकृत निरोगी राहण्यासही मदत होते. हळदीचा नियमित वापर ‘आरोग्यदायी’ ठरतो तो त्यासाठीच! ( Benefits of Turmeric )

Back to top button