Turmeric Farming In Kokan: हळदीच्या माध्यमातून कोकणात आर्थिक क्रांती; पडीक जमिनीवर होणार लागवड | पुढारी

Turmeric Farming In Kokan: हळदीच्या माध्यमातून कोकणात आर्थिक क्रांती; पडीक जमिनीवर होणार लागवड

जयंत धुळप

रायगड:
कोकणातील पडीक जमीन आणि त्याचबरोबर आंबा व काजू बागांमध्ये योग्य जमिनीवर हळदीची लागवड  (Turmeric Farming In Kokan) करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि मट कृषी अ‍ॅग्रोटेक, मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. कोकण कृषी विद्यापीठ आणि खासगी संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर हळद पिकाची लागवड करण्यासाठी सार्वजनिक-खासगी सहकार्य तत्त्वावर राबवण्यात येणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. आगामी सात वर्षांत एक कोटी रुपयांची गुंतवणूक मट कृषी अ‍ॅग्रोटेकच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जात आहे. यामधून कोकणातील शेतकर्‍यांच्या जमिनीवर हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तयार झालेल्या हळदीवर प्रक्रिया करून त्यामधील कुरकुमिन काढणे, हळदीपासून पावडर तयार करणे, त्याचे उत्तमप्रकारे पॅकेजिंग करून विद्यापीठाचा एक स्वतंत्र निर्यातक्षम ब्रँड तयार करून विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. (Turmeric Farming In Kokan)

या प्रकल्पासाठी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रतिदिन दोन टन हळदीवर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेचा कारखाना आणि हळदीची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करण्यासाठी गोदामे बांधण्यात येणार आहेत. हळदीमधील कुरकुमिनची गुणवत्तेची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळाही उभारण्यात येणार आहे. त्यासाठी येणारा सर्व खर्चाचा भार मट कृषी अ‍ॅग्रोटेक कंपनी उचलणार आहे.
येत्या पाच ते सात वर्षात जवळजवळ 9 कोटी रुपयांची गुंतवणूक ही कंपनी करणार आहे. विद्यापीठामार्फत शेतकर्‍यांना हळदीच्या शास्त्रशुद्ध लागवडीचे प्रशिक्षण देणे, उत्तम दर्जाचे हळदीचे बियाणे व रोपे पुरवणे आणि शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात हळद लागवडीसाठी उद्युक्त करणे, यावर विशेष भर दिला जाणार आहे.

कोकणात आंबा, काजू, नारळ याबरोबरच हळद लागवडीतूनही लाखो रुपयांची उलाढाल होणर आहे. यातून शेतकर्‍यांना आर्थिक विकासाचा नवा मार्ग मिळू शकणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारुर येथील शेतकरी संजय मेस्त्री यांनी दोन एकर क्षेत्रात हळद लागवडीतून सुमारे सव्वा लाख रुपयाची उलाढाल यापूर्वी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 23 हेक्टरवर हळदीचे पीक यशस्वीरित्या घेतले असून या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 25 लाखांची जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली होती. परिणामी आता विद्यापीठाच्या नव्या सामंजस्य करारानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणातील उर्वरित रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात देखील पडीक जमीन हळदीच्या लागवडीखाली येऊन येत्या काळात कोकणात पिवळी आर्थिक क्रांती होऊ शकणार आहे.

Turmeric Farming In Kokan : दृष्टीक्षेपात हळद लागवड प्रकल्प

1. हळदीपासून पावडर तयार करुन पॅकेजिंग
2. विद्यापीठाचा स्वतंत्र निर्यातक्षम हळद ब्रँड तयार करणार
3.हळदीवर प्रक्रिया करून कुरकुमिन काढणे
4. कोकणातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार
5. पाच ते सात वर्षात 9 कोटी रुपयांची गुंतवणूक
6. विद्यापीठामार्फत शेतकर्‍यांना हळदीच्या शास्त्रशुद्ध लागवडीचे प्रशिक्षण
7. उत्तम दर्जाचे हळदीचे बियाणे व रोपे पुरवणार
8 .शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात हळद लागवडीसाठी उद्युक्त करणार

हेही वाचा 

Back to top button