china : चीनने अरुणाचल प्रदेशच्या १५ ठिकाणांना चीनी भाषेत दिली नावे | पुढारी

china : चीनने अरुणाचल प्रदेशच्या १५ ठिकाणांना चीनी भाषेत दिली नावे

बीजिंग : वृत्तसंस्था : चीनने ( china ) अरुणाचल प्रदेशातील 15 भागांना चिनी नावे दिली आहेत. मेंडारीन (चिनी) लिपीसह तिबेटी आणि रोमन लिपीतही ही नावे नमूद करण्यात आली आहेत. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून नेहमीच सुरू असतो.

अरुणाचल हा चीनचा भाग असल्याच्या दाव्याला सांस्कृतिक पुराव्याचा आधार मिळावा, हा कुटिल डाव चीनच्या या कृतीमागे आहे. नव्या वर्षात चीनकडून नवा सीमा कायदा लागू होणार आहे. तत्पूर्वी चीनने नामांतराची ही कृती केली आहे. नव्या कायद्यानुसार भारताचा हा भूभाग अधिकृतपणे (चीनच्या लेखी) चीनचा भाग असणार आहे.

चिनी सरकारी माध्यम ‘ग्लोबल टाईम्स’च्या वृत्तानुसार अरुणाचल प्रदेशला चीनने झांग्नान असे नाव दिले आहे. चीनच्या अधिकृत नकाशांत याच नावाचा वापर केला जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते, चीनचा हा निर्णय भारतीय भूभागावर आपला दावा मजबूत करण्यासाठीचा एक डाव आहे. अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण भाग चीनने आपल्या अधिकृत नकाशात दाखविला आहे.

चिनी मंत्रिमंडळाच्या ‘स्टेट कौन्सिल’ने जारी केलेली भौगोलिक नावे अरुणाचलमधील ठिकाणांना देण्यात आली आहेत. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याची ही चीनची दुसरी वेळ आहे. याआधी 2017 मध्ये चीनने अरुणाचलमधील 6 ठिकाणांची नावे बदलली होती. चीनच्या नव्या सीमा कायद्याला भारताने याआधीही कडाडून विरोध केला आहे. नव्या सीमा कायद्याचा प्रस्ताव मार्च 2021 मध्ये चीनमध्ये मांडण्यात आला होता.

चीनने दिली ही नावे

चीनकडून ‘वामो री’, ‘दू री’, ‘ल्हंझुब री’, ‘कुन्मिंगक्झिंग्झ फेंग’ ही नावे चार पर्वत शिखरांना देण्यात आली आहेत. खिंडीला ‘से ला’ हे नाव देण्यात आले आहे. ‘क्झेन्योग्मो हे’ आणि ‘डुलेन हे’ ही नद्यांना देण्यात आलेली नावे आहेत. सेंगकेझाँग, डग्लुंगझोंग, मनिगांग, डुडिंग, मिगपेन, गोलिंग, डांगा, मेजाग ही नावे रहिवासी गावांना देण्यात आली आहेत.

चीनने भारतीय भूभागांच्या नामांतराची कृती दुसर्‍यांदा केली आहे. पण एकतर्फी नावे बदलल्यामुळे अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, ही वस्तुस्थिती चीन कशी बदलणार?
– अरिंदम बागची,
प्रवक्ता, परराष्ट्र मंत्रालय, भारत

Back to top button