सीमेवरील ‘कसईनाथ’ बनतोय गोव्यातील भाविकांचे श्रद्धास्थान | पुढारी

सीमेवरील 'कसईनाथ' बनतोय गोव्यातील भाविकांचे श्रद्धास्थान

प्रभाकर धुरी : पुढारी वृत्तसेवा : गोवा सीमेवरील कसईनाथ डोंगर आणि त्यावरील श्री. शंकराचे देवस्थान गोव्यातील भाविकांचे श्रध्दास्थान बनत आहे. केवळ धार्मिक स्थळ म्हणूनच नव्हे तर त्या ठिकाणच्या नैसर्गिक परिसरही त्यांना भुरळ घालत आहे. त्यामुळे तरुण- तरुणींसह अनेकजण श्रावणात तेथे हजेरी लावतात. शेवटचा सोमवार काल सोमवार (दि. ११) रोजी असल्याने कसईनाथ डोंगरावर भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली.

गोवा सीमेपासून अवघ्या सहा सात किलोमीटर अंतरावर तो डोंगर आहे. आंबेली (ता. दोडामार्ग) गावात आपली वाहने ठेऊन चालत जाण्याची मजा काही औरच!. पायवाटेच्या दोन्हीं बाजूला हिरवी- पोपटी शेती, समोर- वर निमुळता होत जाणारा कसईनाथ डोंगर आणि जंगल झाडीतून डोंगरावर पोहोचल्यावर दिसणारा गोव्याचा विस्तीर्ण परिसरात सगळेच रमणीय, अगदी नजरेत साठवून ठेवावे असेच असल्याचे भाविक सांगत आहेत.

कसईनाथ हे आंबेली व तालुक्यातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. असे म्हटले आहे की, त्या डोंगरावर पांडव येऊन गेलेत.त्यांना एका रात्रीत मंदिर बांधायचे होते. मंदिर बांधता- बांधता कोंबडा आरवला आणि मंदिराचे काम थांबवावे लागले. तेथील शंकराची पिंडी आणि भिंतींचे दगड यावरून ती कथा सांगितली जाते. कसईनाथ म्हणजे शंकर. त्यामुळे दर सोमवारी पर्यटक तेथे दर्शनासाठी जातात. भक्तिभावाने पूजा अर्चा, अभिषेकही करतात. श्रावणात तर सोमवारी खूप गर्दी असते. महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोव्यातील अनेकजण आवर्जून हजेरी लावत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button