

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने पालिका शाळांमधील वापराविना आणि टाकाऊ साहित्य त्वरित काढून घ्यावे. तसेच पालिका शाळांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट व स्ट्रक्चरल ऑडिट त्वरित करावे; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे महापालिकेतील शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.
महापालिकेच्या मोझे शाळेत घडलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर याबाबत सुतार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या हंबीरराव मोझे शाळेत आगीची घटना घडली. शाळेला सुटी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग ही शॉर्टसर्कटिमुळे लागल्याचे समजले. शाळेत अडगळीचे साहित्य, टाकाऊ साहित्य, विनावापराच्या खराब झालेल्या वस्तू, यामुळे आगीची तीव्र ता वाढली.
मात्र, या शाळांमध्ये पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून अग्निशमन यंत्रणा बसविली होती, त्या यंत्रणांची सद्य परिस्थिती काय? त्यातील किती चालू अथवा बंद स्थितीत आहेत? या यंत्रणा चालविण्याबाबत शाळांमधील कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले आहे का? अनेक शाळांमध्ये जुनीच विद्युत व्यवस्था आहे. शाळांमधील विद्यार्थी व कर्मचारी, शिक्षक यांच्या जिवाशी खेळण्याचा कोणताही अधिकार पालिकेला नाही. पालिकेच्या शाळांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट व स्ट्रक्चरल ऑडिट त्वरित करावे, अशी मागणी पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.
हेही वाचा