गोवा : पोर्तुगीज काळातील पोलीस ठाण्याची भिंत कोसळली | पुढारी

गोवा : पोर्तुगीज काळातील पोलीस ठाण्याची भिंत कोसळली

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : पोर्तुगीजांच्या जुलुमी राजवटीची साक्ष असलेली आणि शंभरी पूर्ण केलेली केपे पोलीस स्थानकाची सहा फूट उंच पुरातन संरक्षक भिंतीचा काही भाग बुधवारी (दि.२८) कोसळला.

पोर्तुगीज सत्तेला विरोध करणार्‍या क्रांतिकारांना केपेच्या पोलीस ठाण्यातील कोठडीत डांबले जात होते. त्यांना पळून जाता येऊ नये यासाठी सुमारे दोन मीटर उंच भिंत उभारण्यात आली होती. मागील चोवीस तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या भिंतीचा काही भाग कोसळला आहे.

याबाबत तात्काळ उपाययोजना न केल्यास कोणत्याही क्षणी ही संरक्षक भिंत पूर्णतः कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन पोर्तुगीजकालीन आणि शंभर वर्षें जुनी असलेल्या संरक्षक भिंतीला तडे जाऊन जोरदार पावसात ही भिंत कोसळत असल्याने केपे-मडगाव मार्गावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. भिंतीची तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.

केपे भागात जोरदार पाऊस सुरू आहे. भिंतीचा काही भाग कोसळून रस्त्यावर पडला. त्यावेळी वाहतूक नसल्याने जीवितहानी टळली. उर्वरीत भिंतीचा भाग कोसळत आहे. विशेष महत्त्व असलेल्या या भिंतीची डागडुजी झाली नसल्याने ही भिंत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

कादयच्या सभोवती तट

केपेत सध्याच्या पोलिस स्थानकाला पूर्वी कादय (जेल) असे संबोधले जायचे. पोर्तुगीज काळात गुन्हेगारांबरोबरच स्वातंत्र्य सैनिकांनाही येथेच कैद केले जायचे. कैदी पळून जाऊ नयेत, यासाठी कादयच्या सभोवती ६ फूट कडेकोट तट पोर्तुगीजांनी बांधला होता.
तरीही यावरून काही स्वातंत्र्यसैनिक उडी मारून जाण्यात यशस्वी ठरले होते. या त्यागाची आठवण म्हणून या संरक्षक भिंतीचे जतन होणे गरजेचे होते. आता येथे नवीन पाच मजली सुसज्ज पोलीस स्थानकाची इमारत बांधण्यात येत आहे.

हेही वाचा;

Back to top button