Nathan Lyon बनला ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज! | पुढारी

Nathan Lyon बनला 'अशी' कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने (nathan lyon) ॲशेस मालिकेतील (ashes 2023) दुस-या कसोटीत इतिहास रचला. सलग 100 वी कसोटी खेळण्यासाठी लॉर्ड्स मैदानावर उतरताच तो अशी कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला.

2013 पासून लायन प्रत्येक कसोटीचा भाग

नॅथन लायनने (nathan lyon) 2011 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. यानंतर, तो काही सामन्यांमध्ये संघाचा भाग नव्हता, परंतु 2013 पासून तो ऑस्ट्रेलियासाठी सातत्याने कसोटी सामने खेळत आहे. शेन वॉर्ननंतर लायन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज आहे. कांगारू संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह वॉ यांच्या नावावर आहे. दोघांनी 168-168 कसोटी सामने खेळले आहेत.

लायन 500 बळींच्या उंबरठ्यावर (nathan lyon)

लायनने आतापर्यंत 121 कसोटी सामन्यात 30.99 च्या सरासरीने 495 बळी घेतले आहेत. त्याने 23 वेळा 5 विकेट्स घेण्याची किमया केली आहे. तो 500 विकेट्स क्लबमध्ये सामील होण्यापासून केवळ 5 विकेट्स दूर आहे. मुथय्या मुरलीधरन (800), वॉर्न (708), जेम्स अँडरसन (686), अनिल कुंबळे (619), स्टुअर्ट ब्रॉड (588), ग्लेन मॅकग्रा (563) आणि कोर्टनी वॉल्श (519) यांनी यापूर्वी अशी कामगिरी केली आहे.

लायन (nathan lyon) इंग्लंडमध्ये खेळतोय चौथी ॲशेस मालिका

इंग्लंडमध्ये चौथी अॅशेस मालिका खेळणाऱ्या लायनने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यादरम्यान त्याची गोलंदाजीची सरासरी 31.16 आणि इकॉनॉमी रेट 3.00 आहे. एकूणच, लायनने इंग्लिश भूमीवर 15 कसोटीत 29.51 च्या सरासरीने 58 बळी घेतले आहेत. लियॉनने भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध इंग्लंडमध्ये कसोटी सामनाही खेळला आहे.

‘या’ खेळाडूंनी खेळले सलग 100 कसोटी सामने

सलग 100 किंवा त्याहून अधिक कसोटी खेळण्याचा विक्रम नॅथन लायनच्या आधी 5 खेळाडूंनी केला आहे. अॅलिस्टर कुकने इंग्लंडसाठी 2006 ते 2018 पर्यंत सलग 159 सामने खेळले. त्यानंतर अॅलन बॉर्डरचा नंबर लागतो. त्याने 1979 ते 1994 पर्यंत सलग 153 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. मार्क वॉने 1993 ते 2002 पर्यंत कांगारू संघासाठी 107 कसोटी सामने खेळले. भारताच्या सुनील गावसकर यांचाही या क्लबमध्ये समावेश आहे. त्यांनी 1975 ते 1987 पर्यंत 106 कसोटी खेळले. न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमने 2004 ते 2016 पर्यंत न्यूझीलंडसाठी सलग 101 कसोटी सामन्यांत मैदानात उतरला.

Back to top button