गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार | पुढारी

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात घेण्यात येणार आहे. हे अधिवेशन एक आठवड्याचे असू शकते, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिली. मंगळवार, दि. 6 रोजी पणजी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, विधानसभेचे हिवाळी अधिवेशन जानेवारी महिन्यात घेण्याचे ठरले आहे. तारीख अद्याप निश्चित झाली नसली, तरी जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात हे अधिवेशन होऊ शकते, आठ दिवसांचे हे अधिवेशन असेल, असे सांगून येत्या काही दिवसांमध्ये तारीख नक्की केली जाईल, असेही तवडकर यांनी सांगितले.

आठ दहा दिवसांत नोटीस पाठवणार

काँग्रेसमधून फुटून भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेल्या आठ आमदारांना अपात्र करण्याची जी याचिका काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे, त्याची दखल आपण घेतली आहे. काही प्रमाणात अभ्यास केलेला आहे, अद्यापि अभ्यास सुरू आहे. येत्या आठ दहा दिवसांमध्ये ज्यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे त्या आमदारांना आपण नोटीस पाठवून बोलावून घेणार आहे. अशी माहिती सभापती तवडकर यांनी दिली. याचिकादार गिरीश चोडणकर व इतरांनाही नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे आपण ऐकून घेईन आणि त्यानंतर कायदेशीर बाबी
तपासून योग्य तो निर्णय दिला जाईल, अशी माहिती तवडकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर बोलताना दिली.

Back to top button