पीयूष गोयल, वर्षा गायकवाड, संजय दिना पाटील यांनी भरले उमेदवारी अर्ज | पुढारी

पीयूष गोयल, वर्षा गायकवाड, संजय दिना पाटील यांनी भरले उमेदवारी अर्ज

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घाई सुरू झाली आहे. मंगळवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात उत्तर मुंबईतील भाजप उमेदवार पीयूष गोयल, उत्तर पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आपापले उमेदवारी अर्ज सादर केले. तिन्ही नेत्यांनी देवदर्शनानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी 20 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी 3 मेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरण्याची घाई सुरू केली आहे.
समर्थकांची गर्दी मंगळवारी, सकाळपासूनच वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या पाठिराख्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे पीयूष गोयल यांनी बोरिवली पूर्वेतील प्रसिद्ध श्री पुष्टीपती गणेशाचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार गोपाळ शेट्टी आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते.

त्यांच्यापाठोपाठ उत्तर पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे चरणसिंग सप्रा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राखी जाधव आदी नेते उपस्थित होते.

उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी वर्षा गायकवाड यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. माहीम दर्गा, माहीम चर्च येथे जाऊन प्रार्थना केली. माजी खासदार प्रिया दत्त, आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल आदी नेते यावेळी उपस्थित होते. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या निमित्ताने केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे वांद्य्रात जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गजबजला होता. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. ढोल-ताशांच्या गजरात, आपापल्या पक्षांचे झेंडे हातात घेऊन हजारो कार्यकर्ते या भागात उपस्थित होते.

Back to top button