गोवा : लिंकरोडपूर्वीच होणार ‘टेक ऑफ’; ‘मोप’चे काम वेगात | पुढारी

गोवा : लिंकरोडपूर्वीच होणार ‘टेक ऑफ’; ‘मोप’चे काम वेगात

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मोप विमानतळावरून पहिले विमान 15 ऑगस्ट रोजी उड्डाण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. त्यानंतर विमानतळाकडे जाण्यार्‍या लिंक रोडचे काम सध्या वेगात सुरू आहे. हवामान खात्याने पाऊस लवकर येण्याची शक्यता वर्तविल्याने कामे पूर्णत्वास नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी लिंक रोड होण्यापूर्वीच विमानतळावरून विमान उड्डाण करण्याची दाट शक्यता आहे.

मोप विमानतळ हा तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे, असे वाटत होते. मात्र, ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांना योग्य न्याय मिळालेला नाही. शिवाय शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यांना रोजगार देण्याच्या आश्‍वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही.

मोप विमानतळावर जाण्यासाठी सुकेकुरण धारगळ राष्ट्रीय महामार्ग 66 ते विमानतळापर्यंतचा साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सरकारने जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली आहे. परंतु, त्या अगोदर लिंक रस्त्यासाठी तिथे असणारी झाडे बांधकाम कंपनीने ना हरकत दाखला न घेताच कापून टाकलेली आहेत. मोप लिंक रोडचे कंत्राट अशोका बिल्डर कंपनीला देण्यात आले आहे. त्यासाठी 1 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र, मोप विमानतळावरून पहिल्या विमानाचे उड्डाण करण्यासाठी केवळ तीन महिने बाकी असल्याने मोप लिंक रोड होण्यापूर्वीच उड्डाण होईल, अशी शक्यता आहे.

अंतर्गत रस्त्यांचे होणार रुंदीकरण

एका बाजूने धारगळ सुकेकुरण ते विमानतळापर्यंत लिंकरोड बनवण्याचे काम जोरात सुरू आहे. दुसर्‍या बाजूने मोप विमानतळासाठी जे अंतर्गत रस्ते आहेत, तेही रूंद करण्याचे संकेत सरकारने दिल्यामुळे या ही मुख्य रस्त्याच्या बाजूला जी बांधकामे घरे दुकाने झाडेझुडपे आहेत, त्यांच्यावरही गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button