सातारा : ‘महाराष्ट्र केसरी’चा आज फैसला; पावसामुळे रद्द झालेल्या उपांत्य लढती सकाळच्या सत्रात | पुढारी

सातारा : ‘महाराष्ट्र केसरी’चा आज फैसला; पावसामुळे रद्द झालेल्या उपांत्य लढती सकाळच्या सत्रात

सातारा : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शुक्रवारी पावसामुळे व्यत्यय येऊन उपांत्य फेरीच्या लढती रद्द कराव्या लागल्या. पावसाने मोठे नुकसान झाले असले तरी शनिवारी महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम झुंज होणार आहे. त्यासाठी संयोजकांची टीम रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशील होती. दरम्यान, महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब कोण पटकावणार? कुणा-कुणामध्ये रंगणार मुख्य लढत याची कुस्तीप्रेमींना उत्कंठा लागून राहिली आहे.

येथील जिल्हा क्रीडा संकुलात मंगळवारपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर शुक्रवारी सायंकाळी पाऊस कोसळला. या पावसात स्पर्धेचा आखाडा व लाईटच्या टॉवरचे नुकसान झाले.स्पर्धेचा 50 बाय 250 जो आखाडा आहे त्या आखाड्याचा लाईटचा सेट कोसळला. या सेटवरील हॅलोजन तुटून त्याच्या काचा माती व मॅटरवर पसरल्या गेल्या. जोरदार पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. जोरदार वार्‍यामुळे स्टेजचेही नुकसान झाले. रिसरात सर्वत्र चिखल झाला आहे. व्यासपीठारील सर्व साहित्य भिजले. वार्‍यामुळे साहित्य इकडे तिकडे झाले. शाहू स्टेडियममध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. आखाड्यावर कोसळलेला लाईटसेट उभारण्यासाठी क्रेनला पाचारण करण्यात आले. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात हा सेट पुन्हा एकदा उभारण्यात आला. परंतु, या पावसामुळे आखाड्यातील माती व मॅट भिजले आहे.

त्यामुळे शुक्रवारी होणार्‍या उपांत्य फेरीच्या सर्व लढती रद्द कराव्या लागल्या. मात्र, जिल्हा तालिम संघ व कुस्तीगीर परिषदेने युध्दपातळीवर प्रयत्न केलेे. उर्वरित लढतींसाठी बैठक झाली. यामध्ये शनिवारी सकाळी उपांत्य सामने व सायंकाळी अंतिम लढत खेळवण्याचा निर्णय झाला.त्यामुळे शनिवारी सकाळच्या सत्रात सकाळी 7 वाजता माती विभागात अमरावतीचा पै. माऊली जमदाडे विरूध्द वाशिमचा पै. सिकंदर शेख, सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरूध्द मुंबईचा विशाल बनकर यांच्यात लढत होणार आहे. तर गादी गटात नाशिकचा पै. हर्षवर्धन सदगिर विरूध्द पुण्याचा पै. हर्षल कोकाटे व बीडचा अक्षय शिंदे विरूध्द कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये अंतिम फेरीसाठी कडवी लढत होणार आहे. माती व गादी गटातून अंतिम सामन्यासाठी येणार्‍या दोघांमध्ये तीन नंबरच्या मॅटवर महाराष्ट्र केसरीसाठी निर्णायक फैसला होणार आहे. पावसाने व्यत्यय आणला तरी कुस्तीप्रेमींचे अंतिम झुंजीकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, सायंकाळी महाराष्ट्र केसरीसाठी सायंकाळी अंतिम सामना झाल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार, नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, ना. शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Back to top button