Konkan Walaval Explore : फक्त समुद्र काय पाहता? ‘वालावल’ पण पाहा ना! | पुढारी

Konkan Walaval Explore : फक्त समुद्र काय पाहता? 'वालावल' पण पाहा ना!

स्वालिया शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेहमीच कोकणात आपण समुद्रकिनारी जात असतो. समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन कोकणातली मजा अनुभवl असतो. (Konkan Walaval Explore) आज आम्ही तुमच्यासाठी एका नव्या आणि हिरव्यागार दाट झाडीने वेढलेले असे ठिकाण घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही वन डे आणि टू डे ट्रीप करू शकता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘वालावल’ हे खूप सुंदर आणि घनदाट जंगलांनी वेढलेले ठिकाण आहे. वेंगुर्ल्यापासून हे अंतर अगदी जवळ आहे. त्यामुळे एक तर तुम्ही थेट वालावलला जाऊ शकता किंवा वेंगुर्ला ट्रीप करून पुढे वालावलला जाऊ शकतो. (Konkan Walaval Explore)

लक्ष्मी-नारायण मंदिर, वालावल

हेदेखील वाचा-

”रूप माझे जसे झलक कोकणची गं
मन समिंदर तनु नदी वळणाची गं
गर्द झाडीतली दाट छाया सजणा
आमराई परी माझी काय सजणा
कोकणची चेडवा हो नाखवा
हिच्या घोवाला कोकण दाखवा”

वालावल : केळीच्या पानांवरील चवदार जेवण आणि बरचं काही…

वालावलला जाताना माडांच्या बनातील रस्ता पाहून हे गाणे तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही. वेंगुर्ल्यातून जात असाल तर उत्तमचं. हा रोड हिरवागार आणि ओरिजीनल कोकणची अनुभूती देणारा ठरतो. उतरत्या छतांची कौलारु कोकणी घरे, मोठी परस बाग, दारासमोर तुळस आणि शेणाने सारवलेल अंगण एका वेगळ्या जगात घेऊन जाणारा अनुभव देतो.

वालावल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्य असलेले ठिकाण. चहुबाजूंनी पोफळी, सुपारीच्या बागा, बांबूच्या झाडांनी गर्ड झाडी. केळींच्या झाडांनी झाकलेली घरे, केळीच्या पानांवरील चवदार जेवण आणि बरंचं काही…काय मग! डोळ्यांसमोर उभा राहिला ना कोकणचा निसर्ग! मग हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचा.

श्रीदेव रवळनाथ पंचायतन मंदिर –

वालावलला जाताना बागायत चौके रोडवर वाटेत नारळाच्या बनातील हे छान मंदिर पाहता येईल.

वालावल गावाची वसाहत ही प्राचीन असून, नेरूर येथे सापडलेल्या एका ताम्रपटावरून या गावांचे चालुक्यकालीन नाव ‘बल्लावल्ली’ असल्याचे दिसते.

लक्ष्मीनारायण मंदिर –

वालावल हे गाव घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. अशा निसर्गातील एक सुंदर ठिकाण म्हणजे लक्ष्मीनारायणाचे प्राचीन मंदिर. सूर्यभान आणि चंद्रभान प्रभु-देसाई बंधूंनी १४ व्या शतकाच्या सुरुवातीला हे पूर्वमुखी मंदिर बांधले गेल्याचे म्हटले जाते. हे मंदिर सुख समृद्धी आणि वैभवाचे प्रतिक मानले जाते. मंदिराला लागून एक मोठे तलाव आहे, जे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. त्यास लक्ष्मी नारायण तळे म्हटले जाते. कमळांनी फुललेले हे तलाव आहे. मंदिर परिसारत रवळनाथ मंदिर, घोडसदेव मंदिरे आहेत. मंदिराचे गेट इतके सुंदर आहे की, पाहणाऱ्यांचे पाय आपसुकचं मंदिराकडे वळतात.

आत गेल्यानंतर समोरचं तीन सुंदर आणि उंच दीपमाळा आहेत. मंदिराची वास्तुकला हेमांडपंथी आहे. मंदिरासमोर लागून एक हॉल आहे, जिथे दशवतार, कीर्तन आणि भजन गायले जाते. मंदिरातील अनेक कलाकुसर सागवान लाकडापासून केलेले आहे.

लक्ष्मी-नारायण मंदिरातील खांबावरील एक कोरलेली मूर्ती

काळ्या पाषाणावरील अगदी बारीक कलाकुसर, रामायणातील दृश्ये, अप्सरा, गणपती, शंकर-पार्वती, नर्तकी, वाद्ये वाजवणाऱ्या नर्तिका, शस्त्रे, युद्धातील प्रसंग, शस्त्रे चालवणाऱ्या स्त्रिया, पक्षी, फुले अशा अनेकविध गोष्टी विविध खांबांवर कोरलेले आहे. रामनवमीला येथे मोठा उत्सव असतो.

मंदिराच्या छतावर देखील कोरीव काम केलेले आहे. मुख्य दरवाजा कमी उंचीचा असून त्यावर कमळाच्या फुलांचे कोरीव काम आहे.
पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच ‘आदिपंढरी’ म्हणून ओळखले जाते.

कर्ली नदी –

ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक पश्चिम वाहिनी नदी असून तारकर्ली येथे अरबी समुद्रास मिळते.

कर्ली नदी होडीची सफर –

वालावलमध्येच कर्ली नदी आहे. या नदीचे पाणी जानेवारी ते जूनपर्यंत खारे होते. पावसाळ्यात जुलैपासून डिसेंबर पर्यंत नदीचे गोड पाणी होते. कुडाळ तालुका आणि मालवण तालुका यांना अलग करणाऱ्या कर्ली नदीचा परिसर असंख्य हिरवेगार झाडे, विविध वनस्पती, फुले, पक्षांनी समृद्ध आहे. या नदीमध्ये जर तुम्हा सफर करायला मिळाली तर? व्वा! क्या बात है. मग नक्कीच वालावलच्या कर्ली नदीची होडी सफर तुम्ही अनुभवा. नावाडी काही अंतरावर मोटारीने आणि नंतर वल्हे हाकत नदीची सफर घडवून आणतो. एका बाजूला खारफुटी, कांदळवन तर दुसऱ्या बाजूला अगणित पक्षी पाण्यात डोकावून पाहताना तुम्हाला दिसतील. १०० ते २०० रुपयांमध्ये होडीचा नदीतील प्रवास अनुभवता येतो. (Konkan Walaval Explore )

कर्ली नदीतील बेट –

कर्ली नदीच्यामध्ये एक मोठे बेट असून ते खासगी मालकीचे आहे. या बेटावर अनेक मळे असून त्यामध्ये नारळ, आंबा, सुपारी, फणस, केळी, कोकम, काजू असा रानमेवा आणि इतर गर्द झाडी लपलेली दिसून येईल.

कसे जाल वालावलला?

वेंगुर्ला-बागायत चौके रोड-लोखंडेवाडी-नारायण टेम्पल रोड-वालावल

कुठे राहाल?

वालावलला राहण्यासाठी अनेक सुंदर रुम्स उपलब्ध आहेत. हॉटेल, आणि स्वतंत्र बंगल्यांचीदेखील सोय आहे. अनेक निवासस्थाने गर्द झाडांच्या छायेत गारवा देणारी आहेत. अधिक तापमानात जरी याठिकाणी गेला तरी गारवा अनुभवता येईल, असे हे वालावल ठिकाण आहे. (Konkan Walaval ExploreKonkan Walaval Explore)

काय खाल?

कोकणात आलाय तर मच्छीवर ताव मारायलाचं हवा. सुरमई मच्छी, कोळंबी, बांगडा, मच्छीकरी, चिकन, अंडाकरी, सुकी बोंबील, गोलमा, कोकम, घावणे-चटणी, शहाळ्याचा रस, तांदळाचे पापड, तांदळाचे उकडी मोदक, उकडी पातोळ्या.

वालावलमध्ये आणखी काय पाहाल?

आरावकर गणेश मंदिर, श्री देव कालेश्वर मंदिर, काळसे बेट, कुपीचा डोंगर,

वेंगुर्ल्यात काय पाहाल ? 

वेंगुर्ल्यातील श्री देवी सातेरी देवस्थान, केपादेवी मंदिर, वेतोबा मंदिर, डच वखार, वेंगुर्ला बंदर, लाईट हाऊस, सीगुल पक्षी , वेंगुर्ला फिश मार्केट, वेंगुर्ला दर्शन, समुद्रकिनारा.

मागच्या लेखामध्ये साताऱ्यातील वाई या प्रसिद्ध ठिकाणाविषयी इत्यंभूत माहिती पाहिली होती. त्याआधीही वालावल आणि वेंगुर्ल्यातील मोचेमाड समुद्रकिनाऱ्याची सफरदेखील घडवून आणली होती. यासंदर्भातील लेखाच्या लिंक इथे पाहा-

हेदेखील वाचा-

केपादेवी मंदिर

कर्ली नदी होडीची सफर

 

Back to top button