धान्योत्पादन : बीजोत्पादन मक्याचे | पुढारी

धान्योत्पादन : बीजोत्पादन मक्याचे

मका हे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. भारताच्या अनेक भागात हे पीक तिन्ही हंगामात घेतले जाते. परंतु बीजोत्पादनाकरिता मक्याची लागवड मुख्यत्वे खरीप आणि रब्बी हंगामात करण्यात येते.

मका पीक माणसाच्या खाद्यासाठी तसेच जनावराच्या चार्‍यासाठी खूपच उपयुक्‍त आहे. खासकरून मका बियांपासून तयार होणारे पॉपकॉर्न लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. क्षेत्राच्या बाबतीत भारतामध्ये मक्याचा पाचवा क्रमांक आहे तर उत्पादनाच्या बाबतीत मका चौथ्या क्रमांकावर आहे. 2004-05 मध्ये 4.18 लाख हेक्टर क्षेत्र मक्याच्या लागवडीखाली होते तर याच वर्षी 7.37 लाख टन उत्पादन मिळाले. मक्याच्या झाडाच्या शेंड्याला येणार्‍या तुर्‍याच्या तर फुलातील परागकण त्याच झाडाच्या पेर्‍यामधून येणार्‍या कणसाच्या स्त्रीकेसरावर पडून बीजधारणा होते. कोणत्याही पिकाच्या अधिक उत्पादनामध्ये शुद्ध बियाण्यांचा वापर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शुद्ध बियाणे उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. मका हे परागीभवनाने बीजधारण होणारे पीक असल्यामुळे शुद्ध बियाण्याच्या उत्पादनासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

बीजोत्पादनाकरिता जमीन, हवामान, पेरणी, बियाणे, खते, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण इत्यादी पीक लागवडीच्या बाबी महत्त्वाच्या तर असतातच. परंतु, त्याचबरोबर विलगीकरण अंतर, भेसळ काढणे, काढणी आणि मळणी या बाबींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मका पिकामध्ये मातृ-पितृ वाणाचे आणि एकरी संकरित वाणाचे बीजोत्पादन म्हणून घेतात तर दुहेरी संकर आणि तिहेरी संकरित वाणाचे बीजोत्पादन प्रामाणिक बीजोत्पादन म्हणून घेतात.

मका बीजोत्पादनाकरता काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. मध्यम ते भारी जमिनीत मका पीक चांगले येते. क्षारयुक्‍त, चोपण आणि दलदलीच्या जमिनीत मका पीक घेऊ नये. नदीकाठच्या गाळाच्या पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. ज्या जमिनीत मका बीजोत्पादन घ्यावयाचे आहे, अशा जमिनीत मागील हंगामात मका पीक घेतलेले नसावे. घेतलेले असेल तर अशा जमिनीस पाणी द्यावे आणि बी उगवल्यानंतर नांगरट करून उगवलेले बी नष्ट करण्यात यावे. जमिनीची खोल नांगरट करावी. कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीआधी 10-12 टन शेणखत प्रति हेक्टर जमिनीत मिसळावे.

खरीप मक्याची लागवड जून ते जुलै महिन्यात करावी आणि रबी मक्याची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावी. मक्याची पेरणी सरी वरंबा पद्धतीने करावी. दोन सरीमधील अंतर 75 सेंटिमीटर ठेवून सरीच्या एका बाजूस दोन रोपांमधील अंतर 20 सेंटिमीटर ठेवून टाकण करून लागवड करावी. बियाणे 5 सेंटिमीटरपेक्षा जास्त खोल पडणार नाही याची दक्षता घ्यावी. पेरणी टोकण पद्धतीने करावी.

संकरीत वाणाच्या बीजोत्पादनाकरिता पेरणीच्या वेळेस मादी आणि नर वाणांचे ओळींचे प्रमाण 2:1 याप्रमाणे ठेवावे तर दुहेरी तिहेरी संकरित वाणाच्या ओळीचे प्रमाण 6:2 ठेवण्यात यावे. संकरित मक्याच्या नर आणि मादी वाण पेरणीसाठी या वाणांचा फुलोर्‍यात येण्याचा कालावधीचा अभ्यास असणे महत्त्वाचे आहे. कारण नर आणि मादी वाणाच्या फुलोर्‍यात येण्याचा कालावधी कमी जास्त असण्याची शक्यता असते. बीजोत्पादनासाठी दोन्ही वाण एकाच वेळेेस फुलोर्‍यात येणे महत्त्वाचे असते. त्यानुसार मादी वाण आणि नर वाणाची पेरणी करण्यात यावी.

खरीप हंगामात घेतल्या जाणार्‍या मका बीजोत्पादनास आवश्यकतेनुसार दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. रब्बी हंगामातील मका पिकास 8-10 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाणी मुख्यत्वे पीक फुलोर्‍यात असताना, दाणे भरताना देण्यात यावे. या अवस्थेत पिकास ताण पडल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.

मका पिकास प्रति हेक्टरी 120 किलोग्रॅम नत्र, 60 किलोग्रॅम स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे. उरलेले नत्र समान दोन हप्त्यांत पेरणीनंतर अनुक्रमे 30-45 दिवसांनी द्यावे. उभ्या पिकास नत्राचे खत ओळखीपासून 10 ते 12 सेंटिमीटर अंतरावर देऊन मातीने झाकावे. एक ते दोन वेळा खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. आंतरमशागतीच्या वेळेस 3 ते 5 सेंटिमीटरपेक्षा खोल मशागत करू नये. त्यामुळे मका पिकाच्या मुळास इजा होणार नाही. आंतरमशागतीमध्ये पीक जोमदार वाढीच्या अवस्थेत असताना आधारासाठी पिकास माती लावावी. पिकास जोम वाढविण्याकरिता पीक 3-5 आठवड्यांचे असताना पिकास 3 टक्के युरियाच्या एक ते दोन फवारण्या कराव्यात.

मक्यावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फान 35 टक्के प्रवाह 25 मिलीमिटर, अथवा क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मि.लि. लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर 20, 35 आणि 50 दिवसांनी फवारावे. लष्करी अळी आणि कणसे पोखरणारी अळी यांच्या नियत्रंणासाठी 2 टक्के फॉलीडॉल भुकटी हेक्टर 20 ते 25 किलोगॅ्रम या प्रमाणात पिकावर धुरळावी किंवा क्लोरोपायरीफॉस 20 ई. सी. कीडनाशक 25 मिलिमीटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खोडमाशीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25 ई. सी. 20 मिलिमीटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे अथवा वरीलप्रमाणे फॉलीडॉल भुकटीची धुरळणी करावी. मका पिकावरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम – 54 हेक्टरी 1.5 किलोग्रॅम 1000 लिटर पाण्यात मिसळून 3-4 वेळा फवारणी करावी. पानावरील तांबोरा रोगाच्या नियंणासाठी डायथेन झेड – 78 प्रति हेेक्टरी 2-3 किलोग्रॅम 1000 लिटर पाण्यात मिसळून 3-4 वेळा फवारणी करावी. अशा प्रकारे मक्याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
– प्रसाद पाटील

हेही वाचलंत का? 

Back to top button