धुळे : देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करत टोळीच्या आवळल्या मुसक्या - पुढारी

धुळे : देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करत टोळीच्या आवळल्या मुसक्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी जेरबंद केली आहे. या टोळक्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीचे बनावट पिस्तूल सह चार जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून हत्यार तस्करी बाबतचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी व्यक्त केली आहे.

धुळे शहरातील हुडको भागामध्ये हसिम हरून पिंजारी उर्फ पापा गोल्डन याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत तसेच हवालदार अशोक पाटील, कुणाल पाटील, उमेश पवार, प्रकाश सोनार अशा पथकाला पिंजारी याच्या घरावर कारवाई करण्यासाठी पाठवले. या पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या घरातून देशी बनावटीचे मोडतोड केलेले पिस्तूलचे सुटे भाग आढळून आले. हे सुटे भाग पिस्तुलाचे असल्याची खात्री झाल्याने पिंजारी यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस केली असता त्याने त्याच्या घरी पोलिसांचा छापा पडणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पिस्तुल मोडतोड केल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे आणखी एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूस साक्री तालुक्यातील निजामपूर येथे राहणारा परवेज आसिफ सय्यद याला 15 हजारात विक्री केल्याची माहिती देखील त्यांनी दिली. त्यानुसार निजामपुर येथून परवेज याच्या मुसक्या देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या. परवेज याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हे पिस्तूल जैताने येथील राकेश भिका शेवाळे यांना 25 हजार रुपयात विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे राकेश याला देखील ताब्यात घेण्यात आले. विशेषता राकेश शेवाळे याने या पिस्तुलातून शेतामध्ये एक फायर केल्याची माहिती पुढे आली आहे. या तिघांच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button