कोल्हापूर : डॉ. ग. गो. जाधव अध्यासन इमारत डिसेंबरअखेर पूर्ण करा | पुढारी

कोल्हापूर : डॉ. ग. गो. जाधव अध्यासन इमारत डिसेंबरअखेर पूर्ण करा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन इमारत उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीतून लवकरच भरीव तरतूद करणार आहे. डिसेंबरअखेर हे काम पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.

शिवाजी विद्यापीठातील डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनासंदर्भात शुक्रवारी सायंकाळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद हॉलमध्ये दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्‍त बैठक झाली.

याप्रसंगी पालकमंत्री पाटील यांनी डॉ. ग. गो.जाधव अध्यासन इमारत बांधकामाचा आढावा घेतला. येत्या काही दिवसांत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत अध्यासन इमारतीच्या बांधकामाच्या पुढील खर्चाची तरतूद केली जाईल. इमारत बांधकाम करताना पार्किंगसह इतर गोष्टींचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, डॉ. ग. गो. जाधव अध्यासन व बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी राज्य सरकारने तीन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. कॉर्पस फंडातून इतर गोष्टी केल्या जाणार आहेत. जानेवारीपूर्वी इमारतीचे बांधकाम पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. याप्रसंगी आर्किटेक्ट शीतल पाटील, ओंकार खेबुडकर यांनी ‘पीपीटी’ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून इमारतीसमोर करण्यात येणार्‍या लँडस्केप डिझाईनचे सादरीकरण केले. उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून अ‍ॅम्पी थिएटर, रस्ते, पार्किंग यासह इतर कामांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, आयसीटी, मुंबईचे माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता अनिता पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय जाधव, बांधकाम व्यावसायिक बापू लाड, ठेकेदार सुनील नागराळे, उपकुलसचिव रणजित यादव यांच्यासह विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button