सातार्‍यात 1 लाख 40 हजारांवर मतदार | पुढारी

सातार्‍यात 1 लाख 40 हजारांवर मतदार

सातारा; आदेश खताळ

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने निवडणुकीसाठी सुमारे 115 इमारती निश्चित केल्या आहेत. या इमारतींच्या दुरुस्तीच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. सातारा हद्दवाढीमुळे सुमारे 55 मतदान केंद्रांची वाढ होणार आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण सुमारे 192 मतदान केंद्रे राहणार असून मतदारांची संख्या 1 लाख 40 हजारांवर पोहोचणार आहे.

सातारा नगरपालिकेच्या पार्लमेंटरी बोर्डाची मुदत डिसेंबर 2021 मध्ये संपली. वेळेत निवडणूक न झाल्याने प्रशासकीय कार्यकाल सुरू झाला आहे. गेल्या महिन्यात ब्रेक मिळालेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाल्याने नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्यांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

निवडणूक जून-जुलैमध्ये होणार की ऑक्टोबरमध्ये होणार, यावरून खल सुरू आहे. सातार्‍यात दोन्ही नेते सक्रिय झाले आहेत. निवडणूक कधीही जाहीर झाली तरी तयारी असावी, याद़ृष्टीने नगरपालिका प्रशासन कामाला लागले आहे. 2016 साली झालेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शहरात 137 मतदान केंद्रे होती. त्यामध्ये 55 केंद्रांची वाढ होवून ती सुमारे 192 इतकी झाली आहेत. शहरात पूर्वी मतदानासाठी 70 इमारती ताब्यात घेतल्या जायच्या. या इमारतींची संख्याही वाढली आहे. सुमारे 115 इमारतींमध्ये ही मतदान केंद्रे असतील. मतदान केंद्रे असलेल्या सर्व इमातींची पाहणी करुन आवश्यक ठिकाणी दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने बांधकाम विभागाला सुचना करण्यात आल्या आहेत. सातारा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरु आहे. त्यापूर्वी प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या निकषानुसार निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर मतदार याद्यांचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदार, यावरुन मतदान केंद्रे अंतिम केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान केंद्रे काही प्रमाणात कमी-जास्त होवू शकतात. सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे मतदार संख्या व मतदान केंद्रेही वाढली आहेत. मतदानासाठी आवश्यक असलेल्या कर्मचार्‍यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक कक्ष कामाला लागला आहे.

हद्दवाढ भागातून 40 हजार मतदारांची भर

सातारा नगरपालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत सुमारे 95 हजार 232 मतदार होते. दरम्यानच्या काळात विविध कारणांनी सुमारे 3 हजार 279 मतदार यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे मूळ शहरातील सुमारे 91 हजार 953 इतके मतदार राहिले. त्यातही गेल्या पाच वर्षांतील वाढ लक्षात घेता ही संख्या 1 लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. न. पा. प्रशासनाने हद्दवाढ भागातील मतदारांच्या याद्या संबंधित विभागाकडून मागवल्या आहेत. सातारा पालिका निवडणुकीत हद्दवाढ भागातून सुमारे 40 हजार मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे. येत्या निवडणुकीत शहर व हद्दवाढ भागातील सुमारे 1 लाख 40 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील, असा अंदाज प्रशासनाला आहे.

Back to top button