क्रीडा : सर्वात महागडा वर्ल्डकप | पुढारी

क्रीडा : सर्वात महागडा वर्ल्डकप

सुनील डोळे : डोळे विस्फारणारी अतिभव्य स्टेडियम्स, विविध आकारांतील हिरवेकंच बगिचे, तारांकित हॉटेल्सची रेलचेल, गुळगुळीत रस्ते आणि खास अरबी आदरातिथ्य, यामुळे  लक्षवेधी ठरली. हे आव्हान पेलणे वाटते तेवढे सोपे नव्हते. तथापि, कतारने तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर करून दाखवले. त्यामुळेच आज हा टिचभर देश संपूर्ण जगात कौतुकाचा विषय बनला आहे.

कतारमधील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची आज सांगता होत असून, मेस्सीचा अर्जेंटिना की, एम्बाप्पेचा फ्रान्स विजेता ठरणार? याची रसिकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या मेस्सीची ही शेवटची स्पर्धा आहे. त्यामुळे आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी तो प्रयत्नांची शिकस्त करेल, हेही तेवढेच खरे. असो. ज्यावेळी ‘फिफा’कडून कतारला या स्पर्धेचे यजमानपद जाहीर झाले तेव्हा प्रामुख्याने युरोपातील तालेवार देशांनी नाके मुरडली होती. हा इटुकला देश एवढी विशालकाय स्पर्धा कशी भरवणार? याबद्दल तेव्हा शंका व्यक्त झाल्या होत्या.

मात्र, कतारने केवळ यशस्वी आयोजनच नव्हे; तर आधुनिकता आणि परंपरा यांचा अनोखा संगम साधत स्वतःचे वेगळेपणही दाखवून दिले. यापूर्वी 2006 साली कतारने आशियाई क्रीडा स्पर्धा, 2015 मध्ये पुरुषांची जागतिक हँडबॉल स्पर्धा, त्याच साली जागतिक बॉक्सिंग स्पर्धा आणि 2019 साली जागतिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद यासारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन तेवढ्याच दिमाखदारपणे करून दाखवले होते. मात्र, ‘फिफा’ विश्वचषकाचा पसाराच अवाढव्य. त्यामुळेच कतारच्या आयोजन-क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. ‘फिफा’चे तत्कालीन अध्यक्ष सेप ब्लॅटर यांचाही त्यात समावेश होता, हे येथे उल्लेखनीय.

ब्रिटिशांच्या जोखडातून 1971 साली स्वतंत्र झालेल्या कतार या छोटेखानी देशाने 2010 सालीच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाची शर्यत जिंकली. अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान व ऑस्ट्रेलिया या तगड्या देशांना पराभूत करून कतारने हे यश संपादन केले. त्यावेळी कतार सरकारने जागतिक फुटबॉल महासंघाच्या अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांना 30 लाख पौंड (37 लाख डॉलर) लाच दिली, असा आरोप करण्यात आला होता. दोन वर्षांच्या चौकशीनंतर हा आरोप फेटाळण्यात आला. कतारला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नव्हते. यजमानपदाचा मान मिळताच त्या देशाने विश्वचषक फुटबॉल महोत्सवाची तयारी सुरू केलीसुद्धा.

या स्पर्धेचे आयोजन करणारा कतार हा पहिलाच अरब देश होय. फुटबॉलविश्वातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या आयोजनावर त्यांनी सुमारे 222 अब्ज डॉलर्स खर्च केल्याचे समोर आले आहे. ही रक्कम भारत आणि आशियातील दोन मोठे दिग्गज गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे. साहजिकच, कतारमधील फुटबॉल महोत्सव आतापर्यंतचा सर्वात महागडा ठरला आहे. तो मान कतारने पटकावला, हेही कौतुकास्पद. यजमानपद मिळाल्यापासून कतारने हा जागतिक फुटबॉल महोत्सव यशस्वी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतायला सुरुवात केली.

या स्पर्धेसाठी सहा नवीन स्टेडियम बांधण्यात आले. दोन जुन्या स्टेडियमना नवी झळाळी देण्यात आली. यासोबतच खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी खास स्टेडियम उभारण्यात आले. त्यावर 10 अब्ज डॉलर्स खर्च झाला. अमेरिकन स्पोर्टस् फायनान्स कन्सल्टन्सी फ्रंटच्या मते, कतारने या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता 210 अब्ज डॉलर खर्च केले आहेत. यामध्ये विमानतळ, रस्ते, नावीन्यपूर्ण हब, हॉटेल्स आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे. एकट्या दोहामध्ये, द पर्ल हे खेळाडूंना राहण्यासाठी सप्ततारांकित संकुल उभारण्यासाठी 15 अब्ज डॉलर खर्च करण्यात आले, तर दोहा मेट्रोवर 36 अब्ज डॉलरचा खर्च झाला. एवढेच नव्हे; तर कतारने अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दर आठवड्याला 500 दशलक्ष डॉलर खर्च केले.

आगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे, तर 2018 मध्ये रशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेवर एकूण 11.6 अब्ज डॉलर खर्च करण्यात आले होते. त्यापूर्वी, 2014 मध्ये ब्राझीलमध्ये 15 अब्ज डॉलर, 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 3.6 अब्ज डॉलर्स खर्च करून स्पर्धा आयोजित केली होती. 2006 मध्ये जर्मनीतील फुटबॉल विश्वचषकाचा खर्च 4.3 अब्ज डॉलर्स, जपानमधील 2002 च्या स्पर्धेचा खर्च 7 अब्ज डॉलर्स, फ्रान्सने 1998 मध्ये केलेला खर्च होता 2.3 अब्ज डॉलर आणि अमेरिकेत 1994 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेवर 599 दशलक्ष डॉलर्स खर्च झाले होते.

विश्वचषक स्पर्धेला एक वर्ष बाकी राहिले तेव्हापासून कतारमध्ये उलटगणती सुरू झाली. टी.व्ही.वरील बातम्या असोत अथवा रेडिओवरील विविध कार्यक्रम असोत, सर्व कार्यक्रमांत फुटबॉल विश्वचषक सुरू व्हायला आणखी किती दिवस राहिले आहेत, याची जाणीव प्रकर्षाने करून दिली जात होती. रस्तेबांधणीला सर्वोच्च प्राधान्य देऊन सगळेच रस्ते चकचकीत करण्यात आले. त्याच्या सोबतीला दळणवळण, खाण्याची ठिकाणे, मनोरंजनाची केंद्रे आणि विविध ठिकाणी सुंदर बागा विकसित करण्यात आल्या. फोन आणि इंटरनेटच्या नेटवर्क सुविधेत आमूलाग्र सुधारणा करण्यात आली. विश्वचषकाचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पाहुणे कतारला येणार, याचा विचार करून अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले गेले. त्याद्वारे गर्दी हाताळण्याचे तंत्र विकसित करण्यात आले. म्हणजेच कुठेही आपले हसे होणार नाही याची पुरेपूर दक्षता कतारमधील प्रशासनाने विविध पातळ्यांवर घेतली.

कतारची लोकसंख्या आहे सुमारे 29 लाख. यात मूळच्या कतारवासीयांची संख्या जेमतेम 4 लाख. बाकीचे लोक नंतर येऊन तिथे स्थायिक झाले आहेत. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलच्या साठ्यांमुळे हा देश आज जगातील सर्वात सधन मानला जातो. तेथील दरडोई उत्पन्न आहे 1 लाख 45 हजार 894 अमेरिकन डॉलर. देशाचे क्षेत्रफळ 11,437 वर्ग किलोमीटर. तापमान कधी 40, तर कधी 50 अंश सेल्सिअस. म्हणजे सदासर्वकाळ अंगाची लाही लाही. यावर उपाय म्हणून कतारने या स्पर्धेच्या निमित्ताने लुसैस सिटी नव्याने उभारण्यासाठी 3.66 लाख कोटी रुपये खर्च केले. ही कतारमधील पहिली ग्रीन सिटी ठरली.

ग्रीन सिटी याचा अर्थ शाश्वत शहर. याला इको-सिटी किंवा हरित शहर असेही संबोधले जाते. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय प्रभावाचा सांगोपांग विचार करून ग्रीन सिटीची उभारणी केली जाते. खास डिझाईन केलेले हे हरित शहर एवढे सुंदर दिसते की, पाहताक्षणीच कोणीही त्याच्या प्रेमात पडावे. आपल्या देशाचा विचार केला, तर विस्तीर्ण हिरवाईने नटलेले म्हैसूर हे पहिले हरित शहर होय. अर्थात, कतारने लुसैस सिटीचा चेहरामोहरा बदलताना कसलीही कसर सोडली नाही. आदर्श हरित शहर कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठच कतारने सार्‍या जगापुढे ठेवला आहे.

कतार हा पुराणमतवादी इस्लामी देश असल्यामुळे तिथे सार्वजनिक जीवनात वावरण्यासंबंधीचे नियम आणि कायदे कडक आहेत. त्यामुळेच फुटबॉल चाहत्यांना स्वतःच्या वर्तणुकीबद्दल दक्षता घेण्याच्या सूचना कतार सरकारने स्पर्धा सुरू होण्याआधीच केल्या होत्या. मुख्य म्हणजे, या फुटबॉल स्पर्धेदरम्यान, मद्य प्राशनावर अनेक मर्यादा घालण्यात आल्या. लक्झरी हॉटेलमधील बारमध्येच मद्य विकत घेता येईल, असे निश्चित करण्यात आले. त्यामुळे सामन्यांदरम्यान मद्याचे फेसाळते चषक उंचावून बेहोश वातावरणात प्रेक्षक फुटबॉलचा आनंद लुटत असल्याचे चित्र कतारमध्ये दिसले नाही. या स्पर्धेचे हे वेगळेपण म्हणता येईल.

सुरुवातीला मद्यपानावरील निर्बंधांची घोषणा कतारने केली तेव्हा प्रामुख्याने युरोपमधील फुटबॉलप्रेमींनी त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र, कतारने कोणाचीही पत्रास बाळगली नाही. मुख्य म्हणजे ‘फिफा’नेदेखील याला मौन बाळगून मान्यता दिली. एवढी मोठी स्पर्धा म्हटल्यावर सुरक्षेचा मुद्दा कळीचा ठरणार, हे कतारने वेळीच ओळखले. चिरेबंदी सुरक्षेसाठी आयोजकांनी केलेली तरतूद होती तब्बल 65 हजार कोटी रुपये. स्पर्धेच्या ठिकाणी टेहळणी करण्यासाठी कतारने युरोपमधील सर्वात मोठ्या सुरक्षा कंपनीकडून 24 लढाऊ विमाने आणि 9 अत्याधुनिक प्रशिक्षण जेट विमाने खरेदी केली. याशिवाय हेलिकॉप्टर आणि त्यात वापरण्यात येणारी सुरक्षा उपकरणेही विविध कंपन्यांकडून या स्पर्धेसाठीच विकत घेण्यात आली होती. हे कमी म्हणून की काय 160 देशांतील 20 हजार स्वयंसेवकही स्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी अहोरात्र राबले.

अर्थव्यवस्था बहणार

आपल्या मुंबईहून छोट्या असलेला हा देश सुरुवातीला वैराण वाळवंट होता. मात्र, तिथे पेट्रोल तथा नैसर्गिक वायूचे अमाप साठे सापडले आणि कतारमध्ये लक्ष्मी पाणी भरू लागली. सध्या मध्य पूर्व आशियातील एक धनाढ्य देश असा लौकिक या देशाने संपादला आहे. यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील सतरा लाखांहून अधिक क्रीडाप्रेमींनी कतारला भेट दिली. त्यामुळे जे आर्थिक चलनवलन झाले त्याचा फायदा भविष्यात कतारला मोठ्या प्रमाणावर होणार, हे निःसंशय. एकेकाळी कतारमध्ये कमालीची गरिबी होती. आज तिथे दर तिसरी व्यक्ती करोडपती आहे. शिवाय, या देशात कसलाही कर द्यावा लागत नाही. आरोग्य आणि शिक्षण मोफत आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने कतारमधील पर्यटनाला विलक्षण जोर चढला. 2030 पर्यंत या देशाला दरवर्षी साठ लाख विदेशी पर्यटक येतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

फुटबॉल महोत्सवामुळे नव्या पायाभूत सुविधा तयार झाल्या असून, यानिमित्ताने संपूर्ण जगाला त्याचे विहंगम दर्शन घडले आहे. नेटके आयोजन, कडक शिस्त आणि सोवळ्या वातावरणात पार पडलेला हा फुटबॉल महोत्सव दीर्घकाळ जगभरातील क्रीडाप्रेमींच्या स्मरणात राहील. त्याबद्दल कतारच्या एकूणच व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. यानिमित्ताने जागतिक फुटबॉलचा लंबक आशियाच्या दिशेने झुकला हेही ठळकपणे नमूद केले पाहिजे.

नामांकित संघांना तडाखा

विश्वचषकासाठी पात्रता फेर्‍या 3 वर्षांपूर्वी सुरू झाल्या. विविध खंडांमधील देशांचे अनेक गटांत सामने झाले आणि आघाडीचे संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. इतरांना प्ले-ऑफच्या माध्यमातून आपापली जागा मिळाली. यावेळी 2018 मधील विश्वविजेता फ्रान्स अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. तथापि, सध्याचा युरोपियन चॅम्पियन असलेला इटलीचा संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही. त्यामुळे इटलीची कमतरता यंदा प्रकर्षाने जाणवली. मुख्य स्पर्धेसाठी एकूण 32 संघांची निवड झाली. त्यांची विभागणी आठ गटांत करण्यात आली. मात्र, एकाच खंडातील दोन संघ वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात आले होते. याला युरोपियन देश अपवाद ठरले. यंदा एका गटात दोन युरोपीय देशांचे दोन संघ ठेवण्यात आले. यावेळी ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स व स्पेन हे सट्टेबाजांचे फेव्हरिट संघ होते. विशेष म्हणजे, अर्जेंटिनाला यात स्थान मिळाले नव्हते; तरीही मेस्सीचा हा चमू अंतिम फेरीत दाखल झाला. स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड आणि इंग्लंड हे मुरब्बी संघ उपांत्य फेरीदेखील गाठू शकले नाहीत. त्यांचे आव्हान त्याआधीच संपुष्टात आले.

जिगरबाज मोरोक्को, लढवय्या क्रोएशिया

मोरोक्कोने यंदा सगळ्यांनाच धक्का दिला. हा संघ थेट उपांत्य फेरीपर्यंत झेप घेईल, याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. अर्थात, दहा वर्षे खडतर परिश्रम केल्यानंतर या संघाने बाळसे धरले आह. मोरोक्कोतील या परिवर्तनाला 2009 पासून सुरुवात झाली. 2009 मध्ये मोरोक्कोचे जुने राजे मोहम्मद चौथा यांच्या नावाने फुटबॉल अकादमी उघडण्यात आली. तिथे कच्च्या हिर्‍यांवर पैलू पाडण्यात आले. पोर्तुगालविरुद्ध गोल करणारा स्ट्रायकर युसेफ एन-नेसिरी म्हणजे याच अकादमीचे अपत्य होय. मिडफिल्डर एझेदिन औनाही व इतर खेळाडू या अकादमीतच घडले. आज मोरोक्को संघाची लोकप्रियता एवढी शिगेला पोहोचली आहे की, बाजारात मोरोक्कोची जर्सी मिळणे महाकठीण बनले आहे.

या स्पर्धेत फुटबॉलप्रेमींचे लक्ष वेधून घेतलेला आणखी एक लढवय्या संघ म्हणजे क्रोएशिया. आक्रमण म्हणजेच बचाव हा या संघाचा खाक्या. सुरुवातीपासून त्यांनी आपली छाप पाडली. गटातील पहिल्याच सामन्यात या संघाने

कॅनडाचा 4-1 अशा फरकाने फडशा पाडला. नंतर जपान आणि बेल्जियमला त्यांनी बरोबरीत रोखले. मात्र, या संघाने खरी कमाल केली ती ब्राझीलविरुद्ध. हा सामना त्यांनी बरोबरीत सोडविला. उपांत्य फेरीपर्यंत स्वप्नवत वाटचाल केल्यानंतर तिथे अर्जेंटिनाने त्यांना 3-0 असा दणका दिला. मात्र, क्रोएशिया दिवसेंदिवस एक अग्रगण्य संघ म्हणून जागतिक फुटबॉलजगतात समोर आला आहे.

Back to top button