Stock Market Closing Bell | सेन्सेक्स-निफ्टीत जोरदार विक्री, गुंतवणूकदारांना ४.८३ लाख कोटींचा फटका, घसरणीमागील कारणे काय? | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स-निफ्टीत जोरदार विक्री, गुंतवणूकदारांना ४.८३ लाख कोटींचा फटका, घसरणीमागील कारणे काय?

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारातून कमकुवत संकेत आणि आयटी शेअर्समधील घसरणीने आज सेन्सेक्स आणि निफ्टी लाल चिन्हात बंद झाले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी आज मंगळवारी (दि.१९) आशियाईसह जगभरातील बाजारात घसरण झाली. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारातही उमटले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स तब्बल ८०० अंकांनी घसरला. त्यानंतर सेन्सेक्स ७३६ अंकांच्या घसरणीसह ७२,०१२ वर बंद झाला. तर निफ्टी २३८ अंकांच्या घसरणीसह २१,८१७ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. हेल्थकेअर, आयटी, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स, ऑईल आणि गॅस, पॉवर १ ते २ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप १.३६ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्के घसरला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात IT क्षेत्रात सर्वाधिक विक्री दिसून आली. तर बँकिंग शेअर्समध्ये खरेदी झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांक मिड आणि स्मॉलकॅप्स विभागांतील विक्रीच्या दरम्यान प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले. निफ्टी आयटीसह सर्व क्षेत्रांमध्ये विक्री दिसून आली. यामुळे क्षेत्रीय निर्देशांकांचे नुकसान झाले.

दरम्यान, आजच्या घसरणीमुळे BSE वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.८३ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ते ३७३.९६ लाख कोटी रुपयांवर आले.

TCS टॉप लूजर

सेन्सेक्स आज ७२,४६२ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२ हजारांपर्यंत खाला आला. सेन्सेक्सवर टीसीएस, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, पॉवर ग्रिड हे टॉप लूजर्स होते. तर बजाज फायनान्स, कोटक बँक, भारती एअरटेल हे शेअर्स वाढले.

निफ्टीवर टीसीएस, बीपीसीएल, ब्रिटानिया, सिप्ला, नेस्ले इंडिया हे शेअर्स ३ ते ४ टक्क्यांदरम्यान वाढले. तर बजाज फायनान्स, बजाज ऑटो, हिंदाल्को, भारती एअरटेल हे शेअर्स तेजीत होते.

बाबा रामदेव यांच्या ‘पंतजली’चे नुकसान, कारण काय?

सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना न्यायालयात सुनावणीवेळी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिल्यानंतर आज पतंजली फूड्सचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांनी घसरले. दरम्यान, दुपारच्या सत्रात या शेअर्सने एनएसईवर ३ टक्क्यांहून अधिक घसरणीसह १,३६४ रुपयांवर व्यवहार केला. पतंजली आयुर्वेद कंपनीला बजावलेल्या अवमान नोटिसीवर उत्तर दाखल करण्यात अयशस्वी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोघांना समन्स बजावले आहे. पतंजली आयुर्वेदने औषधी उपचारांबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित करणे सुरू ठेवल्याने न्यायालयाने यापूर्वी अवमान नोटीस जारी केली होती. (Patanjali Foods Share Price)

जागतिक बाजार

आशियाई बाजारात आज नकारात्मक स्थिती दिसून आली. हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात प्रत्येकी १ टक्क्यांहून घसरण झाली. दरम्यान, जपानचा निक्केई सुरुवातीच्या घसरणीनंतर वाढून बंद झाला.

आयटी शेअर्सना मोठा फटका

आज आयटी शेअर्सचे मोठे नुकसान झाले. सेन्सेक्सवर टीसीएसचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरला. TCS सह एचसीएल टेक, विप्रो आणि इन्फोसिस हेही शेअर्स घसरले. एकूणच आयटी निर्देशांक आज २ टक्क्यांनी खाली आला.

परदेशी गुंतवणूकदार पुन्हा विक्रीच्या मूडमध्ये

एनएसई (NSE) वरील माहितीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सोमवारी निव्वळ आधारावर २,०५१ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गंत गुंतवणूकदारांनी २,२६० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

हे ही वाचा :

 

Back to top button