Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ७२,७०० पार बंद, निफ्टी २२ हजारांवर, टॉप गेनर्स शेअर्स कोणते? | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ७२,७०० पार बंद, निफ्टी २२ हजारांवर, टॉप गेनर्स शेअर्स कोणते?

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात आज सोमवार जोरदार ॲक्शन दिसून आली. सपाट सुरुवातीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी वधारून बंद झाले. सेन्सेक्स १०४ अंकांनी वाढून ७२,७४८ वर बंद झाला. तर निफ्टी ३२ अंकांच्या वाढीसह २२,०५५ वर स्थिरावला. कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, ऑटो, रियल्टी, मेटल, मीडिया ०.५ ते ३ टक्क्यांनी वाढले, तर आयटी आणि एफएमसीजी ०.५ ते १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. विशेषतः मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये आज उत्साह दिसून आला. तर एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे वरच्या स्तरावरुन दबाव राहिला. (Stock Market Closing Bell)

टॉप गेनर्स, टॉप लूजर्स शेअर्स कोणते?

बाजारातील मध्य सत्रात काही प्रमाणात विक्री दिसून आली. पण, बाजाराने त्यानंतर सर्व नुकसान पुसून टाकले आणि सेन्सेक्स आणि निफ्टी मध्यम वाढीसह बंद झाले. या आठवड्यात होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयांपूर्वी, गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. याचे पडसाद काही प्रमाणात शेअर बाजारात उमटत आहेत. सेन्सेक्स आज ७२,५८७ वर खुला झाला. त्यानंतर तो ७२,९८५ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर टाटा स्टीलचा शेअर्स टॉप गेनर ठरला. हा शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक वाढून १४९ रुपयांवर पोहोचला. त्याचबरोबर एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, रिलायन्स, सन फार्मा, मारुती, ॲक्सिस बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांदरम्यान वाढले. तर इन्फोसिस, टीसीएस, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, नेस्ले इंडिया हे शेअर्स घसरले.

sensex closing

निफ्टीवर टाटा स्टील, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर टाटा कन्झ्युमर, इन्फोसिस, यूपीएल, टीसीएस, टायटन हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.

अदानींचे शेअर्स घसरले

हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर आता गौतम अदानी समुहासमोर आणखी एक अडचण उभी राहिली आहे. यामुळे अदानी समुहातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेत प्रॉसिक्यूटरने लाचखोरीच्या संशयावरून अदानी समूहाच्या चौकशीत वाढ केल्याचे ब्लूमबर्गने वृत्त दिल्यानंतर अदानी शेअर्सना फटका बसला आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास ४ टक्क्यांनी घसरला. तर अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा शेअर्स जवळपास ३ टक्क्यांनी घसरला. अदानी विल्मर आणि अदानी पॉवर सुमारे एक टक्क्यांनी घसरले. अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी ग्रीन एनर्जी हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी खाली आले. त्यानंतर बंद होताना अदानी शेअर्समध्ये सुधारणा दिसून आली.

परदेशी गुंतवणूकदार

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या शुक्रवारी निव्वळ आधारावर ८४९ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ६८२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. (Stock Market Closing Bell)

हे ही वाचा :

Back to top button