Economic News : अर्थवार्ता | पुढारी

Economic News : अर्थवार्ता

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 107.25 अंक व 376.79 अंकांची घट होऊन, दोन्ही निर्देशांक 21349.4 अंक व 71106.96 अंकाच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.5 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 0.53 टक्क्यांची घट नोंदवली गेली. सलग 7 आठवडे दोन्ही निर्देशांकांनी वाढ दर्शवली होती. त्यामुळे काही प्रमाणात गुंतवणूकदारांनी नफा वसुलीस प्राधान्य दिले. सर्वाधिक वाढ दर्शवणार्‍या कंपन्यांच्या समभागांमध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीज (5 टक्के), नेस्ले इंडिया (4.1 टक्के), टाटा कन्स्युमर प्रॉडक्ट (4 टक्के), कोल इंडिया (3.8 टक्के), विप्रो (3.6 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला, तर सर्वाधिक घट दर्शवणार्‍या कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्राईझेस (-6.1 टक्के), महिंद्रा अँड महिंद्रा (-5.3 टक्के), एचडीएफसी लाईफ (-4.9 टक्के), यूपीएल (-4.8 टक्के), अदानी पोर्टर्स (-4.7 टक्के) या समभागांचा समावेश होतो. (Economic News)

संबंधित बातम्या : 

गत सप्ताहात प्रामुख्याने रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत राहिला. केवळ शुक्रवारच्या सत्रात रुपयाने डॉलरच्या तुलनेत 12 पैसे मजबूत होऊन 83.15 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंदभाव दिला. अमेरिका आणि इराण या देशांमधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले. व्यापारी जहाजांवर लाल समुद्रात हल्ला करणार्‍या सागरी चाच्यांना इराणचा पाठिंबा आहे, असा आरोप अमेरिकेने इराणवर केला. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव पुन्हा 10 डॉलर प्रती बॅरलच्या पुढे गेले; परंतु सप्ताहाअखेर ‘ओपेक’ या खनिज तेल उत्पादक देशाच्या गटातून अँगोला देशाने बाहेर पडण्याचे जाहीर केले. या देशाचा, उत्पादन कपात करून तेलाचे भाव चढे ठेवण्याच्या धोरणाला विरोध असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ‘ओपेक’मध्ये सहभागी नसलेल्या अमेरिकेने विक्रमी प्रतिदिन 13.3 दशलक्ष बॅरल तेलाचे उत्पादन घेतल्याचे जाहीर केल्याने सप्ताहाअखेर ब्रेंटक्रूड 31 पैसे, तर डब्ल्यूटीआय क्रूड 33 पैसे घटून अनुक्रमे 79.39 डॉलर व 73.89 डॉलर प्रती बॅरल स्तरावर बंद झाले. (Economic News)

‘ओला इलेक्ट्रिक’ कंपनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून लवकरच भांडवल बाजारात उतरणार. यासाठी कंपनीने ‘सेबी’ या बाजारनियामक संस्थेकडे अर्ज दिला. याद्वारे कंपनी 5500 कोटींचा निधी उभा करण्याच्या तयारीत आहे. ‘ऑफर फॉर सेल’च्या माध्यमातून सध्याच्या गुंतवणूकदारांचे 95.2 दशलक्ष समभाग विकले जाणार. ओला कंपनी आपली बॅटरी बनवण्याची उपकंपनी ‘ओला सेल प्रायव्हेट टेक्नॉलॉजी’ कंपनीचा व्यवसायविस्तार आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 1200 कोटी रुपये वापरणार. इलेक्ट्रिक दुचाकी बनवणार्‍या कंपन्यांमध्ये ओलाचा बाजार हिस्सा 32 टक्के आहे.

20 डिसेंबरपर्यंत भारतीय भांडवल बाजारातील इक्विटी सदरात परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 20 अब्ज डॉलर्स गुंतवले. वर्ष 2023 मध्ये जपाननंतर सर्वाधिक इक्विटी गुंतवणूक आकर्षित करणार्‍यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जपानने यावर्षी सर्वाधिक 30 अब्ज डॉलर्सची इक्विटी गुुंतवणूक आकर्षित केली. भारतानंतर परदेशी इक्विटी गुंतवणूक आकर्षित करणार्‍यांमध्ये दक्षिण कोरिया (सुमारे 9 अब्ज डॉलर्स), चीन (6.7 अब्ज डॉलर्स), तैवान (4 अब्ज डॉलर्स) या देशांचा समावेश आहे.

ई-कॉमर्स कंपनी ‘शीपरॉकेट’ला खरेदी करण्यासाठी ‘झोमॅटो’ कंपनी उत्सुक. ऑगस्ट 2022 मध्ये ‘शीपरॉकेट’ने 1.23 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर निधी उभा केला होता. सध्या ‘शीपरॉकेट’चे मूल्य 2 अब्ज डॉलर्स असल्याचे तज्ज्ञांचे मत.

आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरल्यावर कुठल्याही कंपनीला 25 टक्के किमान हिस्सा हा सर्वसामान्य जनतेकडे ठेवावा लागतो. (Minimum Public Shareholding) यासाठी कंपनीला 3 वर्षांची मुदत दिली जाते. बाजारात उतरल्यापासून 3 वर्षांच्या आत या नियमाचे पालन करणे आवश्यक असते; परंतु ‘एलआयसी’ या कंपनीच्या बाबतीत ‘सेबी’ या बाजारनियामकाने अटी शिथिल केल्या आहेत. ‘एलआयसी’ला या नियमाचे अनुपालन करण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. 23 फेब्रुवारी 2023 रोजी 949 रुपये प्रतिसमभाग या इश्यू प्राईसवरील एलआयसी समभाग 35 टक्क्यांपेक्षा अधिक कोसळला आहे.

भांडवल बाजारात केलेल्या व्यवहाराची पूर्तता त्याच दिवशी करण्यासाठी (T+O ट्रेंड) सेबी प्रयत्नशील. सध्या भांडवल बाजारात व्यवहार केल्यानंतर पूर्ततेसहित एक किंवा दोन दिवस कालावधी निश्चित करण्यात आला आहे. समभागाच्या तरलतेनुसार (Liquadity) कालमर्यादा निश्चित केली जाते. या कालावधीपूर्वी व्यवहाराची पूर्तता करणे (Settlement) करणे बंधनकारक असते; परंतु आता दोन टप्प्यांमध्ये व्यवहार केलेल्या दिवशीच पूर्तता (Settlement) केली जाईल. पहिल्या टप्प्यात संबंधित दिवशी दीड वाजेपर्यंत जे व्यवहार केले जातील, ते 4ः30 पर्यंत पूर्ण केले जातील आणि दुसर्‍या टप्प्यात हे व्यवहार 3ः30 पर्यंत बाजार संपेपर्यंत पूर्ण केले जातील. मार्च 2024 पर्यंत ही प्रणाली अस्तित्वात आणण्यासाठी सेबी प्रयत्नशील आहे.

दूरसंचारसंबंधी कालबाह्य जुने कायदे नामशेष होणार लवकरच त्या जागी नवीन कालसुसंगत दूरसंचार कायदा अस्तित्वात येणार. ‘इंडियन टेलिग्राफ अ‍ॅक्ट 1885’, ‘इंडियन वायरलेस टेलिग्राफ अ‍ॅक्ट 1033’ हे जुने कायदे रद्द होणार. यामध्ये सिमकार्डसंबंधी फसवणूक केल्यास 50 लाख दंड तसेच 3 वर्षे जेल यासारखा कायदा आहे.

स्पाईस जेट कंपनी आपली प्रतिस्पर्धी कंपनी ‘गोफर्स्ट’ खरेदी करण्यासाठी उत्सुक. वाडिया समूहाच्या ‘गोफर्स्ट’ कंपनीने ‘एनसीएलटी’ या दिवाळखोरी हाताळणार्‍या न्यायाधिकरणाकडे स्वेच्छा दिवाळखोरी अर्ज दाखल केला होता. प्रॅट अँड व्हिटनी या कंपनीने पुरवलेल्या सदोष विमान इंजिनमुळे वाडिया समूहाला मोठे नुकसान सोसावे लागले होते. 3200 कोटींची गुंतवणूक करूनदेखील तीन वर्षे नुकसान झाले. अखेर दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय वाडिया समूहाने घेतला होता.

भारतासाठी दिलासादायक बातमी. एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान भारताने खनिज तेल आयातशुल्क (Import Bill) 113.4 अब्ज डॉलर्सवरून 87.1 अब्ज डॉलर्सवर खाली आले. वर्षाच्या सुरुवातीला भारताने आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहारचातुर्य दाखवून रशियावर आर्थिक बंधने आल्यावर सुमारे 30 ते 35 टक्के स्वस्तात खनिज तेल खरेदी केले. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत या 8 महिन्यांत सुमारे 26 अब्ज डॉलर्सची बचत झाल्याचे स्पष्ट होते.

आंतरराष्ट्रीय कंपनी वॉलमार्ट ‘फ्लिपकार्ट’मध्ये 600 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार. फ्लिपकार्ट सध्या सुमारे 1 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 8300 कोटी) निधी उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. 600 दशलक्ष वॉलमार्टकडून आल्यावर 400 दशलक्ष इतर गुंतवणूकदारांमार्फत उभे केले जाणार. मागील निधी उभारणीच्या सत्रात फ्लिपकार्टचे मूल्य 35 अब्ज डॉलर्स धरण्यात आले होते. यावेळी मूल्यामध्ये 5 ते 10 टक्क्यांची वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत. ‘वॉलमार्ट’चा फ्लिपकार्टमध्ये 80 टक्क्यांहून अधिकचा हिस्सा आहे.

15 डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी तब्बल 9.1 अब्ज डॉलर्सनी वधारून 616 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. मागील दोन वर्षांची ही उच्चांकी पातळी आहे.

Back to top button