भारतीय ग्रोथवाढीबरोबर तुमचीही वेल्थ ग्रोथ होतेय का?

भारतीय ग्रोथवाढीबरोबर तुमचीही वेल्थ ग्रोथ होतेय का?

आज जगातील प्रगत देशाची अर्थव्यवस्था दोन ट्रिलियनवरून पाच ट्रिलियनवर पोहोचते, त्या काळात शेअर मार्केट किती प्रमाणात वाढले आहे, हे लक्षात घेतले, तर भविष्यकाळात आपला कॅपिटल मार्केट कोठे असेल, याचा अंदाज बांधता येईल.

चीनची 2004 मध्ये दोन ट्रिलियन अर्थव्यवस्था होती. 2009 मध्ये ती पाच ट्रिलियनवर पोहोचली. या पाच वर्षांमध्ये त्यांचा इंडेक्स हा 8,500 वरून 32,000 वर पोहोचला आहे. या प्रगतीच्या काळात चीनचा भांडवली बाजार चार पटीने वाढला आहे. 1977 मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन होती आणि पाच ट्रिलियन होण्यासाठी 1988 वर्ष उजाडले. या काळात डाऊजोन्स इंडेक्स 700 अंकावरून हा 12,000 वर गेला. या 11 वर्षांत 17 पटीने भांडवली बाजार वाढलेला दिसतो. जपानची अर्थव्यवस्था 1978 मध्ये दोन ट्रिलियन होती. 1986 मध्ये ती पाच ट्रिलियनवर पोहोचली. या आठ वर्षांत 2000 अंकावरून निक्केही इंडेक्स 37 हजारांवर पोहोचलेला दिसतो. आठ वर्षांत 18 पटीने भांडवली बाजार वाढला आहे.

2014 मध्ये भारताची अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन होती. येणार्‍या दोन ते तीन वर्षांमध्ये पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल, तर मार्केट किती असेल, याचा अंदाज घेतला पाहिजे. इंडियाच्या ग्रोथ स्टोरीमध्ये आपण सहभागी झाले पाहिजे. मागील दहा वर्षांत काय प्रगती साधली आहे, याचा आराखडा मांडला आहे.

संभावना 1) वरीलप्रमाणे मागील दहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था 7.56 टक्के वाढ दर्शविली आहे. भविष्यात अशीच वाढ गृहीत धरली, तर 2033 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 8 ट्रिलियन होईल. सेन्सेक्सने मागील दहा वर्षांत 13 टक्के वाढ दर्शविली आहे. हीच वाढ भविष्यात गृहीत धरली, तर 2033 मध्ये सेन्सेक्स 239364/- संभावना 2) जर 2033 मध्ये 10 ट्रिलियन अर्थव्यवस्था झाली, तर मात्र सेन्सेक्स तुम्हाला साडेतीन लाखांहून अधिक झालेला पहावयास मिळेल.

कोणत्याही देशाची प्रगती वाढणारी अर्थव्यवस्था GDP सकल राष्ट्रीय वरून मोजली जाते. आपल्या देशाचा प्रगतीचा आलेख पाहिल्यास स्वतंत्र झाल्यापासून एक डॉलर ट्रिलियन अर्थव्यवस्था निर्माण होण्यासाठी 1947 ते 2007 अशी साठ वर्षे लागली. दुसरी ट्रिलियन अर्थव्यवस्था 2007 ते 2014 अशी अवघ्या सात वर्षांत झाली आणि 2013 ते 2023 या मागील दहा वर्षांत चार ट्रिलियन अर्थव्यवस्था झाली आहे. आता हा प्रगतीचा वेग कोणीही रोखू शकत नाही. या वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेत तुम्ही कोठे आहात, हे पाहणे गरजेचे आहे.

मागील दहा वर्षांमध्ये जीडीपी 1.80 ट्रिलियनवरून आज 3.73 ट्रिलियन पोहोचला. याचा अर्थ दहा वर्षांत आपली अर्थव्यवस्था 7.56 टक्क्यांनी वाढली आहे. डिसेंबर 2013 मध्ये 20,714 अंकांंचा सेन्सेक्स आज 71,483 उच्चांकी अंकावर आहे. याचा अर्थ मागील दहा वर्षांत मार्केटने 13 टक्के परतावा दिला आहे. जिथे सोन्याने 8 टक्के परतावा दिला आहे, डेब्ट मार्केट ने 7.3 टक्के परतावा दिला आहे. बँक ठेवीचा दर सरासरी 7 टक्के आहे. महागाई सरासरी 5.6 टक्क्यांनी वाढली आहे.

2013 मध्ये देशाचा GDP 1.80 ट्रिलियन डॉलर होता, त्या वेळी मार्केट कॅपिटल 70 टक्के होते. आज 71 हजारांवर सेन्सेक्स गेला असून मार्केट कॅपिटल 103 टक्क्यांवर पोहोचला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था 2013 मध्ये इतर देशांच्या तुलनेत दहाव्या क्रमांकाला होती, ती आज ब्रिटनला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर आलेली आहे. पुढच्या दोन वर्षांत 5 ट्रिलियनवर जाईल. मॉर्गन स्टेनली यांच्या मते 2027 पर्यंत जर्मनीला मागे टाकून भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचेल आणि 2033 पर्यंत तो तिसर्‍या क्रमांकावर येईल.
राष्ट्रीय सकल उत्पन्न आजच्या पेक्षा तीन पट होत असेल, तर भांडवली बाजारही कदाचित पाच ते सात पटीने वाढेल.

सेन्सेक्सपेक्षा चांगला परतावा मिळण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली पाहिजे. मागील दहा वर्षांत भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रातील इतिहास पाहिल्यास 30 नोव्हेंबर 2008 रोजी 5 लाख कोटी असलेली गुंतवणूक मालमत्ता 30 नोव्हेंबर 2013 मध्ये 8.90 लाख कोटींवर पोहोचले. दहा वर्षांनंतर 30 नोव्हें. 23 अखेर 49 लाख कोटींवर पोहोचला. आज 50 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे.

मागील दहा वर्षांत म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक मालमत्ता पाचपटीहून अधिक वाढ पाहावयास मिळत आहे. मागील दहा वर्षांत मार्केटने 13 टक्के परतावा दिला आहे. त्या तुलनेत म्युच्युअल फंडातील काही लार्ज कॅप योजनांनी 15 ते 18 टक्के परतावा दिला आहे. मिड कॅप योजनांनी सरासरी 18 टक्के ते 20 टक्के स्माल कॅप योजनांनी 18 ते 22 टक्के परतावा दिला आहे. आपल्या देशात नियमित गुंतवणूक पद्धत एसआयपी (SYSTEMATIC INVESTMENT PLAN) गुंतवणूक लोकप्रिय ठरली आहे. नोव्हें. 23 अखेर 7.44 कोटी खात्यांतून 17,000 कोटी दरमहा मार्केटमध्ये गुंतवणूक होताना दिसत आहेत. डिजिटल इंडियामुळे सहज गुंतवणूक होऊ शकते. मागील दहा वर्षांत इक्विटी म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

2013 मध्ये सेन्सेक्स 20 हजार होता. मागील दहा वर्षांत दोन वेळा मोठ्या प्रमाणात मार्केट कोसळले होते. 2015 मध्ये युआन चलनाचे अवमूल्यन झाले. तेव्हा 22 टक्के मार्केट कोसळले होते. त्यानंतर कोव्हिड काळात 38 टक्के मार्केट कोसळले होते. परंतु, दीर्घकाळाचा विचार केला असता आज सेन्सेक्स 71,484, निफ्टी 21,457, बँक निफ्टी 48,144 अशा उच्चांकी अंकांवर पोहोचले आहे. मागील दोन महिन्यांत प्रचंड तेजी पाहावयास मिळत आहे. याचे कारण मागील पंधरवड्यात परदेशी गुंतवणूकदारांची 40 हजार कोटींची खरेदी झाली आहे. अजूनही परकीय गुंतवणूकदारांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.

सध्या मार्केट कॅपिटल ते जीडीपी रेषो पहिल्यास 103 टक्के आहे. सेन्सेक्स पीई रेषो 25.32 निफ्टी, 22.92 बँक निफ्टी 16.51 आहे. बीएसई मिडकॅपचा पीई 28.54, बीएसई स्माल कॅप 27.81 आहे. जितका पीई रेषो जास्त तितके मार्केट महाग असते. आता मार्केट महाग आहे. सध्या गुंतवणूक करताना सावधपणे करणे गरजेचे आहे. आज आपल्या देशाची एकूण लोकसंख्या 143 कोटी आहे. 57 कोटी युवक 23 वर्षांच्या खाली आहेत. आठ कोटी लोक आयकर भरतात. म्युच्युअल फंडात अवघे चार कोटी लोक गुंतवणूक करीत आहेत. नोव्हें. 23 अखेर 13 कोटी डीमॅट अकाऊंट उघडलेले आहेत. आजच्या परिस्थितीत एकूण लोकसंख्येपैकी 8 टक्के लोक या बाजारात उतरले आहेत. आगामी दहा वर्षांत आर्थिक क्षेत्रामध्ये कित्येक पटीने गुंतवणूकदारांची संख्या वाढणार आहे. येणार्‍या उत्पन्नामधील जास्तीत जास्त बचत करून भांडवली बाजारातील चांगल्या कंपन्या, म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news