Stock Market Closing Bell | बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा जोर, ‘हे’ शेअर्स आघाडीवर | पुढारी

Stock Market Closing Bell | बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा जोर, 'हे' शेअर्स आघाडीवर

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी राहिली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांच्या वक्तव्याने व्याजदरवाढीबाबत कमी झालेली चिंता आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील स्थिरता आदी मुद्दे बाजाराच्या वाढीस कारणीभूत ठरले. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ६६,५३८ वर गेला. तर निफ्टी १३६ अंकांनी वाढून १९,८२७ वर पोहोचला. त्यानंतर सेन्सेक्स ३९३ अंकांच्या वाढीसह ६६,४७३ वर स्थिरावला. तर निफ्टी १२१ अंकांनी वाढून १९,८११ वर बंद झाला. आज पीएसयू बँक वगळता सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली.

दरम्यान, आजच्या सत्रातील तेजीमुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १.९ लाख कोटी रुपयांनी वाढून ३२१.६१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर विप्रोचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ३.२९ टक्क्यांनी वाढून ४२१ रुपयांवर पोहोचला. अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, एम अँड एम, एचडीएफसी बँक, आयटीसी, कोटक बँक, ॲक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, एलटी हे शेअर्सही वाढले. दरम्यान, एचसीएल टेक, एसबीआय, टीसीएस हे शेअर्स घसरले.

हिरो मोटोकॉर्प, विप्रो, ग्रासिम इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे निफ्टीवर टॉप गेनर्स राहिले. तर एचसीएल टेक्नॉलॉजीज, अदानी पोर्ट्स, एसबीआय, कोल इंडिया आणि टीसीएस हे लूजर्स ठरले.

पीएसयू बँक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक ऑटो, एफएमसीजी, मेटल, फार्मा, पॉवर, ऑईल आणि गॅस, रियल्टी ०.५-१ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.७ टक्क्यांनी वाढला.

जागतिक बाजारातील स्थिती काय सांगते?

फेडरल रिझव्‍‌र्ह व्याजदरवाढ थांबणार असल्याच्या शक्यतेने बुधवारी जागतिक बाजारपेठेत तेजी आली. तसेच चीन मोठ्या प्रमाणावर आर्थिक वाढीला प्रोत्साहन देण्याचा विचार करत असल्याच्या अहवालामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. यामुळे आशियातील टोकियो, सिडनी, सेऊल, तैपेई, मनिला आणि जकार्ता येथील निर्देशांकांनी सुरुवातीला हिरव्या चिन्हात व्यवहार केला. मंगळवारी अमेरिकेच्या बाजारातील निर्देशांक वधारुन बंद झाले होते.

एफआयआय बनले विक्रेते

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) मंगळवारी सलग १५ व्या सत्रात त्यांच्या विक्रीचा सिलसिला कायम ठेवला. त्यांनी १,००५ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) १,९६३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

Back to top button