PMI Index : गुंतवणूकदारांसाठी महत्वपूर्ण असलेला ‘PMI-निर्देशांक’ कसा काढतात? | पुढारी

PMI Index : गुंतवणूकदारांसाठी महत्वपूर्ण असलेला 'PMI-निर्देशांक' कसा काढतात?

प्रा. डॉ. विजय ककडे

पुढारी अर्थभान : PMI Index : गुंतवणूकदार व्यक्ती व संस्था यांना अर्थकारणाची दिशा व गती याबाबत महत्त्वपूर्ण अंदाज बांधणेसाठी गुंतवणूक कोठे व कधी करावी यासाठी जे उपयुक्त निर्देशांक आहेत; त्यामध्ये पीएमआय इंडेक्स (Purchasing Manager’s Index-PMI- Index) महत्त्वाचा ठरतो. पीएमआय इंडेक्स कसा काढतात व त्यातून निष्कर्ष किंवा संकेत कोणते मिळतात, हे पाहू.

PMI Index : पद्धती

पीएमआय निर्देशांक हा उत्पादन क्षेत्रातील आर्थिक आरोग्य व्यक्त करतो व तो विविध कंपन्यांच्या व्यवस्थापकांची नमुना पाहणीतून व्यक्त होणार्‍या मतावर अवलंबून असतो. त्यामध्ये नव्या ऑर्डरचे प्रमाण (30% महत्त्व), उत्पादन (25%), रोजगार (20%), पुरवठादारांचा माल पुरवठा कालावधी (15%) आणि खरेदी केलेल्या (कच्चामाल) मालाचा साठा (10% महत्त्व) यांचा समावेश होतो. यातील होणारी वाढ निर्देशांक वाढवतो. परंतु पुरवठा कालावधी निकष मात्र उलट घेतला जातो.

PMI Index : पीएमआय इंडेक्स – दिशा

पीएमआय इंडेक्स सर्व प्रमुख देशांचा तयार केला जातो व तेजी अथवा मंदीकडे वाटचाल शक्यता त्यातून व्यक्त होते.
जेव्हा पीएमआय इंडेक्स 50 पेक्षा अधिक असतो व गत महिन्यांच्या तुलनेत (3 महिन्यांची) वाढत आहे का यावर उत्साहाचे, तेजीचे, सकारात्मक कल मानले जातात. उलट 50 पेक्षा कमी निर्देशांक व 3 महिन्यांचा घटीचा कल यांना मंदीचा, निराशाजनक कल मानला जातो.

पीएमआय इंडेक्स जागतिक पातळीवर 50 च्या खाली असून पुन्हा घटीची प्रवृत्ती दर्शवतो म्हणजे येणारे वर्ष मंदीसद़ृश्य असणार, असा निष्कर्ष निघतो. सिंगापूरचा अपवाद सोडला तर सर्वच देश मंदीचा कल दर्शवत असले तरी 17 देशांत हा निर्देशांक 50 पेक्षा पुढे आहे, तर 37 देशांत 50 च्या खाली आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सर्वाधिक (उच्चांक) भारतात असून सर्वात कमी ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड येथे 38.5 इतका आहे.

PMI Index : भारत-जागतिक विकासाचा नेता

एस अँड पी जागतिक पीएमआय निर्देशांकानुसार सेवा क्षेत्रातील सर्वाधिक वाढीने गेल्या 13 वर्षांत भारत आघाडीवर आहे. सेवा क्षेत्राचा पीएमआय 62.3 असून 2010 पासून सेवा क्षेत्र प्रबळपणे वाढत असून, हा निष्कर्ष 400 उद्योगांवर आधारित असून वित्तक्षेत्र झपाट्याने वाढत आहे. सेवा क्षेत्राची आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता वाढत असल्याचे त्यातून स्पष्ट होते. उत्पादन क्षेत्राचा पीएमआय 57.8 वरून 57.7 असा 0.1 टक्केने घसरला तरी सेवा क्षेत्र व उत्पादन क्षेत्र यातून एकत्रित पीएमआय 61.9 असा बळकट आहे.

PMI Index : अन्वयार्थ

गुंतवणूक वातावरण पुढील सहा महिन्यांसाठी आश्वासक असून, विदेशी गुंतवणूकदार भारतातील गुंतवणूक वाढवणार व शेअर निर्देशांक वाढणार हे स्पष्ट होते. बाजारात तात्पुरती घट नव्याने गुंतवणुकीची संधी ठरते. क्षेत्रीय फायद्याच्या संधी अधिक दिसतात. गुंतवणुकीस भारत सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र ठरणार असल्याने वेगवान विकासाकडे आपण जागतिक विकासाचे इंजीन ठरतो. ही संधी प्रत्यक्षात आणण्यासाठी पायाभूत गुंतवणूक वाढ (कॅपेक्स) शांतता व सुव्यवस्था, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ या पूर्वअटीची पूर्तता करावी लागेल. जागतिक विश्वास सार्थ करणेस प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल!

हे ही वाचा :

Back to top button