गोल्ड फंडामधील गुंतवणुकीची योग्य वेळ! | पुढारी

गोल्ड फंडामधील गुंतवणुकीची योग्य वेळ!

भरत साळोखे

कोविड – 19 च्या भयंकर लाटेने जगाची जशी वाताहत केली, तशीच जागतिक अर्थव्यवस्थेची आणि देशोदेशींच्या शेअर बाजारांचीही केली. मार्च 2020 मध्ये शेअर बाजाराने तळ गाठला. एप्रिलपासून या पडझडीतून शेअर बाजाराने सावरण्यास सुरुवात केली आणि नऊ महिन्यांमध्येच बाजाराने पुन्हा उच्चांक नोंदवण्यास सुरुवात केली. परंतु पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने भारताला हैराण करण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा शेअर बाजार अनिश्‍चिततेच्या लाटांमध्ये हेलकावे खाऊ लागला.

अनिश्‍चितता हा जरी शेअर बाजाराचा 

स्थायिभाव असला तरी अनिश्‍चिततेच्या काळातील पडझड हा खरे म्हणजे बाजाराला स्थिरस्थावर (Consolidate) होण्यास मदत करते आणि अनिश्‍चितता संपली की बाजार दुप्पट वेगाने उसळी मारतो. हा इतिहास आहे. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले, तर 2008-09 च्या भयानक मंदीनंतरची 2009-2019 ही दहा वर्षे अमेरिकेमध्ये तेजीचे तुफान घेऊन आली. 

Every dark cloud has a silver Living अशी एक इंग्रजी म्हण आहे. कोणत्याही संकटाला एका आशेचा किरण असतो. त्याचप्रमाणे गुंतवणुकीच्या जगातही अशा मंदीच्या काळात गुंतवणूकदारांना एक आशेचा किरण नेहमी दिसतो आणि तो म्हणजे सोन्यामधील गुंतवणूक. सोन्याचे आकर्षण भारतीयांना किती आहे, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु हे आकर्षण सोन्याचे दागिने घडवून ते वापरण्याचे आहे. गुंतवणुकीचे साधन म्हणून नाही. परंतु 2020 मध्ये सर्वत्र कोरोनाने शेअर बाजार धाराशायी होत असताना गोल्ड फंडांनी गुंतवणूकदारांना सरासरी 26 टक्क्यांचा जो भरघोस परतावा दिला, तो पाहून इथून पुढे सोन्यामधील आणि पर्यायाने गोल्ड फंडामधील गुंतवणुकीला सोन्याचे दिवस येतील असे वाटते. गेल्या एक वर्षातील विविध गोल्ड फंडांनी दिलेला आकर्षक परतावा पुढील चार्टमध्ये पहा. 

Gold Mutual Funds जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा, त्याचे दोन प्रकार असतात. पहिला Gold Fund आणि दुसरा Gold ETF-Gold Exchange Traded Fund! या दोन फंडांमधील मूलभूत फरक समजून घ्या! Gold ETFs हे त्यांच्यामधील 99.5 टक्के गुंतवणूक ही शुद्ध सोन्यामध्ये mining, processing, fabricaltion आणि distribution करणार्‍या ज्या कंपन्या आहेत. त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे Gold ETF पेक्षा Gold Fund मधील परतावा हा थोडा अधिक असतो.

दुसरा फरक म्हणजे Gold ETF हे स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणीकृत असतात आणि शेअर्सप्रमाणे त्यांच्या युनिटचेही स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. 

दागिन्यांचा वापर हा मुद्दा सोडला, तर प्रत्यक्ष सोन्यामध्ये गुंतवणूक न करता गोल्ड फंडांमध्ये करण्याचे फायदे बरेच आहेत. त्यातील काही खालीलप्रमाणे.

1) गुंतवणुकीतील Diversification चा हेतू साध्य होतो.

2) मंदीच्या काळात शेअर बाजारातील पडझडीमुळे आपल्या गुंतवणुकीची Value कमी होते. अशा वेळी Gold Funds हे संरक्षक कवच म्हणून काम करतात.

3) प्रत्यक्ष सोने हाताळताना किंवा साठवून ठेवताना ज्या झीज, जोखीम, असुरक्षितता या बाबींचा विचार करावा लागतो; तो इथे करावा लागत नाही. 

4) अगदी कमीत कमी रकमेपासून गुंतवणूक करता येते. (किमान प्रथमतः रु. 5000 आणि त्यापुढे रु. 1000 च्या पटीत कितीही) शिवाय तुम्ही मासिक रु. 500/- प्रमाणे यामध्ये SIP द्वाराही गुंतवणूक करू शकता.

आता महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे सोन्यामध्ये किंवा गोल्ड फंडामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का? तज्ज्ञांच्या मते, रुपयांचे होणारे अवमूल्यन, अल्पबचत, गुंतवणुकीवरील घटते व्याजदर आणि कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेमुळे बाजारात आलेली अस्थिरता, यामुळे सोन्यामध्ये पुन्हा तेजी येऊ शकते आणि त्यामधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो.

 

Back to top button