Investment : गुंतवणुकीची वेळ आणि वेगाचे गणित महत्त्वाचे | पुढारी

Investment : गुंतवणुकीची वेळ आणि वेगाचे गणित महत्त्वाचे

अनिल पाटील, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

भविष्याच्या आर्थिक गरजा ठरवल्यानंतर जितक्या लवकर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल तितके तुम्ही कमी पैशांमध्ये मोठी रक्कम उभी करू शकाल. पैशाच्या वाढीचा वेग आणि दीर्घकाळ या दोन गोष्टी गुंतवणुकीत अतिशय लक्षणीय आणि परिणामकारक ठरतात.

आयुष्याच्या भावी काळात खर्‍या अर्थाने पैसा वाढवायचा असेल, तर तुम्ही वेळेत पैसे द्या!

पैसा वाढविण्यासाठी वेळ द्या, नाही तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते. त्याला उशिराची किमत म्हणतात. वेळेसारखी मौल्यवान वस्तू जगात कोणतीही नाही. भविष्यातील आर्थिक गरजांसाठी गुंतवणूक निर्णय घेताना वेळेला फार महत्त्व असते. ज्यांची आर्थिक धोरणे ठरलेली नसतात, ते पैसे सुरक्षित ठेव म्हणून एक-दोन वर्षे मुदतीसाठी बँकेत ठेवतात आणि अचानक लागणारा पैसा वर्षानुवर्षे बचत खात्यात पडलेला असतो. जिथे तीन टक्के व्याजाने दुप्पट होण्यासाठी चोवीस वर्षे लागतात. आजचे बचत खात्यावरील 10 हजार रुपये चोवीस वर्षांत 20 हजार म्हणजे दामदुप्पट होतील. चोवीस वर्षांत महागाई 8टक्के वाढते. पैसा तीन टक्क्यांनी वाढतो. म्हणजेच येथे उणे पाच टक्के परतावा मिळतो. ज्या गोष्टीसाठी आज 10 हजार खर्च होतात त्याच गोष्टीसाठी 24 वर्षांनंतर आठ टक्के महागाईने 80 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. तो खर्च पूर्ण करण्यासाठी पदरचे त्या वर्षीच्या उत्पन्नातील जादा 60 हजार मोजावे लागणार आहेत. हीच गोष्ट सर्वांना मोठ्या आर्थिक अडचणीत आणते. आजचे छोटे खर्च भविष्यात मोठे डोंगर होऊन आपल्या पुढे आ वासून उभे राहतात, तेव्हा पैसा कमी पडू नये म्हणून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही पैशाचे प्रभावी व्यवस्थापन केले पाहिजे.

गुंतवणूक करताना नेहमी आपल्याला माहीत असायला हवे की, मी गुंतवणूक का करावी? कशासाठी करावी? केव्हा करावी, हे आपण ठरवत नाही तोपर्यंत गुंतवणूक करणे योग्य नाही. भविष्याच्या आर्थिक गरजा ठरवल्यानंतर जितक्या लवकर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल तितके तुम्ही कमी पैशांमध्ये मोठी रक्कम उभी करू शकाल. वेळ आणि वेग या दोन गोष्टी पैसा वाढविण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. तुमची संपत्ती दीर्घकाळात धिम्या गतीने वाढत असेल, तर भविष्यात ती अनेक पटीने होण्यासाठी भरपूर वेळ खाईल; परंतु तोच वेग जास्त असेल, तर वेळ पुढे सरकत जाईल तसा मोठा पैसा होत जाईल. पैशाच्या वाढीचा वेग आणि दीर्घकाळ या दोन गोष्टी अतिशय लक्षणीय आणि परिणामकारक ठरतात. त्यासाठी एक उदाहरण पाहूया!

मुलांचे उच्च शिक्षण आणि लग्न कार्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करावी लागते आणि या गोष्टीसाठी भविष्यात योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली, तरच तुम्हाला पुरेसा पैसा उपलब्ध होईल, नाही तर तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी कर्जाचा बोजा घेऊन जगावे लागेल.
मुलांचा जन्म झाल्याबरोबर आर्थिक नियोजनाचे ज्ञान मिळाले, तर कमी पैशात मोठ्या स्वरूपात पैसा उपलब्ध करू शकाल. जितका नियोजनाला उशिरा कराल तितकी तुम्हाला उशिराची किंमत मोजावी लागते. सध्या मुलांना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोठा खर्च करून शिक्षण दिले जाते आणि उच्च शिक्षणावेळी हात आखडले जातात. मुलांचे करिअरचे नुकसान झालेले पाहायला मिळते. खरे तर लहानपणापेक्षा मोठेपणी शिक्षणासाठी अधिक खर्च केला पाहिजे, तरच मुलांचे भवितव्य घडू शकेल. त्यासाठी मुलांच्या शैक्षणिक धोरणांचा आराखडा केला पाहिजे. त्यानुसार गुंतवणुकीस लवकर सुरुवात केली पाहिजे. पुढील उदाहणावरून ते अधिक स्पष्ट होईल.

रमेशला सुमीत नावाचा नुकताच मुलगा झाला आहे. रमेशला त्याला पुण्यासारख्या शहरात उच्च शिक्षण द्यायचे आहे. पुण्यातील नामवंत महाविद्यालयात बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी चार लाख याप्रमाणे खर्च येत आहे. म्हणजेच बारावी नंतर चार वर्षांसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आजचा खर्च 16 लाख येतो आणि दोन वर्षांचा पदव्युत्तर खर्च 10 लाख येतो. आजच्या काळात संपूर्ण शिक्षण देण्यासाठी 26 लाख खर्च येतो. शिक्षण क्षेत्रातील महागाई वाढ आठ टक्क्यांनी गृहीत धरली, तर आजपासून वीस वर्षांनंतर रमेशला मुलांच्या परिपूर्ण शिक्षणासाठी वाढत्या महागाईने 1,26,76,000 इतक्या रकमेची गरज भासेल, मग रमेशला वीस वर्षांत सव्वा कोटी रक्कम गोळा करायची असेल, तर आजपासून म्युच्युअल फंडाच्या सीपद्वारे 12 टक्के परतावा गृहीत धरून दरमहा 13,500 रुपयांची गुंतवणूक केली, तर वरीलप्रमाणे शैक्षणिक फंड निर्माण होऊ शकतो. समजा रमेशने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि दोन वर्षे काहीच गुंतवणूक केली नाही, तर रमेशला उशिरा गुंतवणूक केल्याची किंमत किती मोजायला लागते, ते पाहूया!

मुदत 20 वर्षे गुंतवणूक उद्दिष्ट 1,26,00,000 रुपये आजपासून गुंतवणूक केली, तर प्रतिमहिना 13600 रुपये. 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. एकूण गुंतवणूक 32,64,000 रुपये मुदत पूर्तीनंतर 1,26,00,000 रुपये मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध होतील.

दोन वर्षे उशिरा सुरुवात केल्याने वरील आर्थिक उद्दिष्ट पूर्तीसाठी 18 वर्षे शिल्लक राहतील. प्रतिमहिना 17600 रुपये गुंतवणूक केल्यास एकूण गुंतवणूक 38,01,600 रुपये, दोन वर्षे गुंतवणूक उशिरा केल्याने 5,37,600 रुपये जादा गुंतवणूक करावी लागेल. त्याची भविष्यातील उशिराची किंमत 31,08,339 रुपये इतकी होते.

रमेशचा मुलगा 16 वर्षांचा झाला आहे. तोपर्यंत काहीच गुंतवणूक केली नसेल, तर म्हणजेच तुम्हाला 16 वर्षे उशिरा सुरुवात केल्यास वरील आर्थिक उद्दिष्टपूर्तीसाठी 4 वर्षे शिल्लक राहतील. प्रतिमहिना 1,38,000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. चार वर्षे मुदत राहिल्याने डेब्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी लागेल. 8 टक्के परतावा गृहीत धरून रमेशला एकूण गुंतवणूक 99 ,36,000 रुपये होईल. सोळा वर्षे गुंतवणूक उशिरा केल्याने पहिल्या वर्षाच्या तुलनेत 67 ,72 ,000 रुपये जादा गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच तुम्ही उशिरा गुंतवणुकीस सुरुवात केल्याने 68 लाख जादा रक्कम मोजावी लागते. यामध्ये 1,19,40,382 रुपये इतकी उशिराची किंमत मोजावी लागते.
रमेशने काहीच गुंतवणूक केली नाही, तर मात्र मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज काढावे लागेल. समजा पूर्णतः शिक्षण पूर्ण होण्यासाठी एकूण 100,00,000 रुपये कर्ज काढले, तर पुढील पाच वर्षांत दरमहा 2,07,000 रुपयांप्रमाणे एकूण कर्जाची रक्कम 1,24,55,000 रुपये इतकी रक्कम द्यावी लागते.

वरील उदाहरणाचा विचार केला, तर मुलगा जन्मल्यानंतर लगेच गुंतवणुकीस सुरुवात केली, तर फक्त 32 लाखांत मुलांचे शिक्षण पूर्ण होते. योग्य गुंतवणुकीचे निर्णय न घेतल्यामुळे किंवा जसे जसे रमेश उशिरा गुंतवणुकीस सुरुवात करणार तितकी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे नियोजन न केल्याने फार मोठे नुकसान होत असते, हे लक्षात घेऊन मुलगा अथवा मुलगी जन्मल्याबरोबर उच्च शिक्षणासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

Back to top button